Matt Renshaw Record: ऑस्ट्रेलियासाठी पुनरागमन करत असलेल्या मॅट रेनशॉने पहिल्याच सामन्यात आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये डर्बनच्या मैदानावर पहिल्या कसोटी सामन्याचा थरार पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना मॅट रेनशॉने १९० धावांची वादळी खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याने ८४ धावा केल्या. फलंदाजीत धुमाकूळ घातल्यानंतर गोलंदाजी करताना त्याने २ गडी बाद केले. यादरम्यान त्याने एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर करत, जॅक कॅलिसचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
या सामन्यातील पहिल्या दिवसापासून ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने २१४ धावांनी दमदार विजयाची नोंद केली. गेल्या ३ वर्षांपासून मॅट रेनशॉ संघाबाहेर होता, पण पुनरागमन करताच त्याने आपल्या संघाला आपल्या फलंदाजीच्या बळावर विजय मिळवून दिला आहे. २०२३ मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत तो आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.
मॅट रेनशॉने मोडला कॅलिसचा रेकॉर्ड
दोन्ही डावात केलेल्या कागमिरीनंतर मॅट रेनशॉ हा दक्षिण आफ्रिकेत कसोटी क्रिकेट खेळताना एकाच कसोटी सामन्यात २५० हून अधिक धावा करणारा आणि कमीत कमी २ गडी बाद करणारा जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू जॅक कॅलिसला मागे टाकलं आहे. हा रेकॉर्ड आधी जॅक कॅलिसच्या नावे होता.
यासह कसोटी क्रिकेटच्या १४९ वर्षांच्या इतिहासात अशी कागमिरी करणारा तो जगातील ११ वा खेळाडू ठरला आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसराच फलंदाज ठरला आहे. याआधी भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि रचिन रवींद्रच्या नावेही या रेकॉर्डची नोंद आहे.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ३९० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने २८४ धावा केल्या. यासह ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने ३१४ धावा करून डाव घोषित केला आणि दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ४२१ धावांचे आव्हान दिले. पण दक्षिण आफ्रिकेचा डाव २०६ धावांवर आटोपला. यासह ऑस्ट्रेलियाने हा सामना २१४ धावांनी आपल्या नावावर केला.
