Travis Head Post For Temba Bavuma: ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं आणि मालिकेत १-० ने आघाडी घेतली. हा सामना दक्षिण आफ्रिकेला २१४ धावांनी गमवावा लागला आहे. मुख्य बाब म्हणजे, तेंबा बावूमाच्या नेतृत्वाखाली खेळताना दक्षिण आफ्रिकेने गेल्या १२ कसोटी सामन्यांपैकी एकही सामना गमावला नव्हता. पण डर्बनच्या मैदानावर झालेल्या पहिल्याच सामन्यात पराभव होताच, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेडने तेंबाला ट्रोल करणारी स्टोरी शेअर केली आहे.
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात दमदार खेळ केला. पण हेडने सामना झाल्यानंतर जे केलं, ते अनेकांना आवडलेलं नाही. सामना झाल्यानंतर हेडने तेंबाचा मजेशीर मीम आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. हा एक एनिमेटेड रिॲक्शन व्हिडीओ आहे. या व्हिडीओच्या खाली त्याने जोश हेझलवूडने चौथ्या डावात गोलंदाजीत केलेल्या कामगिरीचा स्क्रीन शॉट आहे. यासह हेझलवूड डान्स करताना दिसून येत आहे. या डावात गोलंदाजी करताना हेझलवूडने १७.५ षटकात ४९ धावा खर्च केल्या आणि ६ गडी बाद केले. त्याने स्टोरी तर शेअर केली, पण तो हे विसरून गेला की त्याने दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराला ट्रोल केलं आहे.
ही मालिका अतिशय खास आहे. कारण २०१८ मध्ये झालेल्या सँडपेपर प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला आहे. ८ वर्षांनंतर पहिल्यांदाच दौरा करत असलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्याच सामन्यात मोठा विजय मिळवल्यानंतर जल्लोष होणं स्वाभाविक होतं. पण हेडची ही कृती क्रिकेट चाहत्यांना आवडलेली नाही.
ऑस्ट्रेलियाचा दमदार विजय
हा सामना ऑस्ट्रेलियाने २१४ धावांच्या फरकाने जिंकला. पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने ३९० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव २८४ धावांवर आटोपला. पहिल्या डावात आघाडी घेल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ३१४ धावा करून डाव घोषित केला. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ४२१ धावा करायच्या होत्या. पण दक्षिण आफ्रिकेला २०६ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह ऑस्ट्रेलियाने मोठा विजय मिळवला. पण हेड दोन्ही डावात फ्लॉप राहिला. पहिल्या डावात तो अवघ्या ९ तर दुसऱ्या डावात अवघ्या ११ धावा करून माघारी परतला.
