South Africa vs South Africa 3rd Test: दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना जिंकून ३ कसोटी सामन्यांची मालिका २-१ ने आपल्या नावावर केली आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना केप टाऊनच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २८८ धावांचे आव्हान ठेवले होते. पण दक्षिण आफ्रिकेच्या धारदार गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव अवघ्या १११ धावांवर आटोपला. यासह दक्षिण आफ्रिकेने हा सामना १७६ धावांनी आपल्या नावावर केला.
ऑस्ट्रेलियाची फ्लॉप फलंदाजी
या सामन्यात धावांचा बचाव करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला सुरूवातीपासूनच एकापाठोपाठ एक मोठे धक्के दिले. अवघ्या ४२ धावांवर ऑस्ट्रेलियाचे ६ फलंदाज तंबूत परतले होते. ट्रॅव्हिस हेड अवघ्या १४ धावा करून तंबूत परतला. तर मॅट रेनशॉला खातंही उघडता आलं नाही. मार्नस लाबुशेन ४, जोश इंग्लिस ४ तर अॅलेक्स कॅरी अवघ्या २, कूपर कॉनोली ० आणि मिचेल स्टार्कही शून्यावर माघारी परतला.कॅमेरून ग्रीनने ११० चेंडू खेळून काढले आणि २७ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना सायमन हार्मरने सर्वाधिक ५ आणि कगिसो रबाडाने ३ गडी बाद केले. सायमन हार्मरने दोन्ही डावात मिळून १० गडी बाद केले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना मार्कस एकेरमनने सर्वाधिक ९५ धावांची खेळी केली. तर एडेन मार्करमने ७८, डेव्हिड बेडिंघहॅमने ५० आणि मार्को यान्सेनने ५२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने ३२९ धावांपर्यंत मजल मारली.
पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनीही दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४२९ धावांचा डोंगर उभारून १०० धावांची आघाडी घेतली होती. ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिसने सर्वाधिक १०२, अॅलेक्स कॅरीने ८० तर कॅमरून ग्रीनने ६५ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनीही तोडीस तोड उत्तर दिलं. वियान मुल्डरने ११५ आणि रायन रिकल्टनने १०१ धावांची दमदार शतकी खेळी केली. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात ३८७ धावा करून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २८८ धावांचं आव्हान दिलं.
