ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ६७ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा वनडे सामना जोहान्सबर्गमध्ये सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसला. जोश हेझलवूडने एडेन मारक्रमला पहिल्याच चेंडूवर बाद करत माघारी धाडलं. दरम्यान त्याला बाद करण्यासाठी कूपर कॉनोलीनेन भन्नाट झेल घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
एडेन मारक्रमच्या नावे नकोसा रेकॉर्ड
या सामन्यातील पहिल्या चेंडूवर बाद होताच एडेन मारक्रमच्या नावे नकोसा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. मारक्रम हा वनडे क्रिकेटमधील पहिल्याच चेंडूवर बाद होणारा दक्षिण आफ्रिकेचा चौथा फलंदाज ठरला आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हर्षल गिब्स अव्वल स्थानी आहे. २००२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात गिब्स पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतला होता. त्यानंतर हाशिम आम्ला २०११ आणि २०१३ मध्ये पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतला होता. त्यानंतर जानमन मलान २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतला होता.
कूपर कॉनोलीने घेतला भन्नाट कॅच
तर झाले असे की, या डावात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मारक्रम आणि क्विंटन डी कॉकची जोडी मैदानावर आली. तर ऑस्ट्रेलियाकडून पहिले षटक टाकण्यासाठी जोश हेझलवूड गोलंदाजीला आला. या षटकातील पहिलाच चेंडू त्याने ऑफ साईडच्या दिशेने टाकला. या चेंडूवर एडेन मारक्रमने पॉईंटच्या वरून फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्याने फटका व्यवस्थित मारला. पण पॉईंटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या कूपर कॉनोलीने उंच उडी मारून एका हाताने अविश्वसनीय झेल घेतला. हा झेल पाहून एडेन मारक्रमही आश्चर्यचकीत झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग ११): एडन मारक्रम, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रीट्झके, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को यान्सेन, डुआन यान्सेन, ब्योर्न फोर्टुइन, केशव महाराज, लिझाड विल्यम्स
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग ११): मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, कूपर कॉनोली, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मॅट रेनशॉ, कॅमेरून ग्रीन, जॅक एडवर्ड्स, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, अॅडम झॅम्पा, जोश हेझलवूड
