दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघांदरम्यान बुधवारी होणारा ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना चुरशीचा होणे अपेक्षित आहे. या सामन्यात दोन्ही संघांच्या कर्णधारांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडीन मार्करम आणि न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर हे दोघेही चांगल्या लयीत आहेत. त्यामुळे दोघांमध्ये चांगली स्पर्धा पाहायला मिळेल.
२०१५ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला नमविले होते. त्यामुळे डेल स्टेन आणि ए बी डिव्हिलियर्स यांसारख्या खेळाडूंना धक्का बसला होता. दक्षिण आफ्रिकेचा संघ हा जागतिक क्रिकेटमध्ये भक्कम समजला जातो. गेल्या वर्षी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकताना त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. दक्षिण आफ्रिकेला आतापर्यंत मर्यादित षटकांच्या प्रारूपात कोणताही ‘आयसीसी’ चषक उंचावता आला नाही. त्यामुळे यावेळी त्यांचा पूर्ण प्रयत्न राहणार आहे.
मार्करम, सँटनर केंद्रस्थानी
मार्करमने स्पर्धेत आतापर्यंत १७५ हून अधिकच्या ‘स्ट्राइक रेेट’ने २६८ धावा केल्या आहेत. त्याने ‘पॉवरप्ले’मध्ये आपली चुणूक दाखवली. दुसरीकडे, सँटनरने फलंदाजांना अडचणीत आणले. यासह फलंदाजीतही त्याने योगदान दिले. मार्करम, क्विंटन डिकॉक, डेवॉल्ड ब्रेव्हिस, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर आणि मार्को यान्सन यांसारखे फलंदाज दक्षिण आफ्रिकेकडे आहेत. मात्र, सँटनरकडे रचिन रवींद्र (नऊ बळी), ग्लेन फिलिप्स आणि कोल मॅकाँची यांसारख्या फिरकीपटूंचा पर्याय आहे. या सर्वांनी मिळून चांगली कामगिरी केली. भारत सोडल्यास दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच चांगल्या फिरकी माऱ्याचा सामना करेल. न्यूझीलंडच्या ईश सोढीची लय ही संघाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांत प्रभावी कामगिरी केलेली नाही.
ईडन गार्डन्स खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल?
ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेचा संघ न्यूझीलंडविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करेल. न्यूझीलंडने आपले सर्व ‘अव्वल आठ’ फेरीतील सामने श्रीलंकेच्या धिम्या खेळपट्ट्यांवर खेळले आहेत. कोलकाताची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असते. त्यामुळे फिन ॲलन, टिम सेफर्ट, ग्लेन फिलिप्स आणि डॅरेल मिचेल यांना प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यास त्यांचा प्रयत्न २००हून अधिक धावा करण्याचा असेल. लुंगी एन्गिडीच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेची मदार असेल.तर, न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्यूसनही गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. त्यामुळे पहिल्या उपांत्य सामन्यात दोन्ही संघांमध्ये चांगली चुरस पहायला मिळेल.
संघ :
न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन एलन, टिम सेफर्ट, रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉन्वे, काएल जेमिसन, जेकब डफी, ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिचेल, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, ईश सोढी, लॉकी फर्ग्यूसन, कोल मॅकाँची, जेम्स नीशम.
दक्षिण आप्रिका : एडीन मार्करम (कर्णधार), क्विंटन डिकॉक, रायन रिकेलटन, डेव्हॉल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को यान्सन, कॉर्बिन बॉश, कगिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, जॉर्ज लिंडे, क्वेना मफाका, आनरिक नॉर्किए, जेसन स्मिथ.
वेळ : सायं. ७ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १,२, १ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.
