मेलबर्न : चार वर्षांत तिसर्यांदा ऑस्ट्रेलियन खुली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकण्यास उत्सुक असलेल्या अरिना सबालेन्कासमोर आज, शनिवारी होणार्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात एलिना रायबाकिनाचे आव्हान असणार आहे. २०२३ मध्ये रायबाकिनाचा पराभव करून सबालेन्काने प्रथमच ऑस्ट्रेलिया स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे आजच्या सामन्यातही सबालेन्काचेच पारडे जड मानले जात आहे.
गेल्या वर्षी सबालेन्काला एकूण पाच स्पर्धांच्या अंतिम लढतीत पराभव पत्करावा लागला होता. यात ऑस्ट्रेलियन स्पर्धेचाही समावेश होता. मात्र, या पराभवांतून सबालेन्काला खूप काही शिकण्यास मिळाले. ‘‘मी ज्या स्पर्धेत पराभूत झाले, त्यामध्ये काय चुका झाल्या याची कल्पना मला आहे. गेल्या वर्षी मला खूप काही शिकण्यास मिळाले. यंदाच्या हंगामात त्या चुका पुन्हा होणार नाहीत याची मी काळजी घेईन,’’ असे सबालेन्का म्हणाली.
रायबाकिनालाही संधी
सबालेन्का आणि रायबाकिना यांनी अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात एकही सेट गमावलेला नाही. २००८ नंतर कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेत असे झालेले नाही. कझाकिस्तानच्या रायबाकिनाने उपांत्य सामन्यात जेसिका पेगुलावर विजय मिळवला होता. आता सबालेन्काविरुद्ध ही लय कायम राखण्याचा ती प्रयत्न करेल.
या दोन खेळाडूंत २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धेचा अंतिम सामना झाला होता. तेव्हा रायबाकिनाने पहिला सेट जिंकला होता. मात्र, त्यानंतरचे दोन सेट गमावल्याने ती अखेरीस ४-६, ६-३, ६-४ अशी पराभूत झाली होती. आता त्या पराभवाची परतफेड करण्यासह प्रथमच ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकण्याची तिच्याकडे संधी आहे.
- वेळ : दुपारी २ वा.
- थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन २, ३

