चांगवोन, कोरिया येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकात स्पोर्ट्स पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावणाऱ्या कोल्हापूरच्या राही सरनोबतला मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे सर्वोत्तम महिला क्रीडापटूच्या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे रविवारी होणाऱ्या संघटनेच्या वार्षिक समारंभात कारकिर्दीत शंभर शतकांच्या अनोख्या विक्रमाची नोंद करणाऱ्या सचिन तेंडुलकरला एका विशेष पुरस्काराने सन्मानित करणार आहे. ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असणार आहेत.
सचिनने गेल्या वर्षी मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध शंभरावे शतक झळकावले होते. या अद्भुत कामगिरीचा गौरव करण्यासाठी सचिनला गौरवण्यात येणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
मुंबई संघातील सचिनचा सहकारी अभिषेक नायरला रणजी हंगामातील सातत्यपूर्ण अष्टपैलू प्रदर्शनासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. नायरने रणजी हंगामात ९६६ धावा करताना मुंबईच्या ४०व्या रणजी जेतेपदात निर्णायक भूमिका बजावली होती. रणजी विजेत्या मुंबई संघाचाही या निमित्ताने सत्कार करण्यात येणार आहे.
हॅरिस शिल्ड स्पर्धेत ४७३ धावांच्या मॅरेथॉन खेळी साकारणाऱ्या अरमान जाफरला कनिष्ठ स्तरावरच्या शानदार प्रदर्शनासाठी वर्षांतील सर्वोत्तम कनिष्ठ क्रिकेटपटू पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पूनम राऊतला सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
कॅली, कोलंबिया येथे झालेल्या वर्ल्ड गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या स्नूकरपटू आदित्य मेहता सर्वोत्तम क्रीडापटूचा मानकरी ठरला आहे. २७ वर्षीय आदित्य आशियाई विजेताही आहे.
युवा उदयोन्मुख मुंबईकर स्क्वॉशपटू महेश माणगावकर आणि बॅडमिंटनपटू तन्वी लाड यांना सर्वोत्तम कनिष्ठ क्रीडापटू म्हणून गौरवण्यात येणार आहे. भारतीय खेळांमध्ये कबड्डीपटू दीपिका जोसेफ सर्वोत्तम क्रीडापटू ठरली आहे.
हॉकी खेळाला अमूल्य योगदान देणाऱ्या मर्जबान बावा पटेल यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या क्रीडा विश्वाचा वेध घेणाऱ्या  ‘जागर महाराष्ट्राचा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. ३३ विविध क्रीडा लेखकांनी या पुस्तकासाठी लेखन केले आहे.