क्रिकेटचा देव अशी ओळख असलेला खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोघेही टीम इंडियासाठी उत्तम खेळ केलेले खेळाडू. एक काळ असा होता की या दोघांची जोडी हिट ठरली होती. मात्र अनेक वादांमुळे विनोद कांबळीला क्रिकेटचे मैदान सोडावे लागले. मात्र हीच जोडी पुन्हा एकदा मैदानावर उतरते आहे. याच अनुषंगाने या दोघांनी आशीर्वाद घेतले ते क्रिकेटमधले द्रोणाचार्य समजल्या जाणाऱ्या आचेरकर सरांचे. सचिन आणि विनोद कांबळी या दोघांची जोडी जशी चर्चेत होती तशीच आचेरकर सरांची म्हणजेच या दोघांच्या गुरुंचीही तेवढीच चर्चा त्यावेळी होती. या आठवणी ताज्या केल्या आहेत दस्तुरखुद्द सचिनने. या संदर्भातली पोस्ट फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट केली आहे तसेच फोटोही शेअर केले आहेत.

आजची दुपार माझ्यासाठी विशेष आहे कारण ज्या व्यक्तीने आम्हाला शिकवलं, आम्हाला तयार केलं. आपण कोण आहोत याची जाणीव ज्या व्यक्तीने करून दिली त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत असं म्हणत सचिनने फेसबुक आणि ट्विटरवर फोटो शेअर केले आहेत.

शाळेपासून सचिन आणि विनोद कांबळी एकत्र होते. क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर त्यांच्या मैत्रीचे किस्सेही चांगलेच रंगले होते. धावांचा पाऊस पाडणारी ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. कारण सचिनला त्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात साथ देण्याचा निर्णय विनोद कांबळीने घेतला आहे. सचिनने इंग्लिश मिडलसेक्स काउंटी क्लबसोबत नवी क्रिकेट प्रबोधिनी स्थापन करतो आहे. तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अॅकेडमी या नावाने ही प्रबोधिनी ओळखली जाईल. या प्रबोधिनीद्वारे सचिन जगभरातले युवा क्रिकेटपटू घडवण्याचं काम करणार आहे. त्याच्या या प्रकल्पात त्याला विनोद कांबळीचीही साथ लाभली आहे. १ नोव्हेंबरपासून याचा शुभारंभ होतो आहे म्हणूनच ही जोडी आशीर्वाद घेण्यासाठी आचरेकर सरांकडे पोहचली होती. ज्याचे फोटो सचिन तेंडुलकरने ट्विटर आणि फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर केले आहेत.

सचिनचही अॅकेडमी राज्याच्या वेगवेगळया भागांमध्ये कॅम्प आयोजित करुन प्रशिक्षण देण्याबरोबरच युवा प्रतिभावान क्रिकेटपटूंचा शोध घेणार आहे. १ ते ४ नोव्हेंबर दरम्यान नेरुळच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये त्यानंतर ६ ते ९ नोव्हेंबर दरम्यान वांद्रे एमआयजी क्लब येथे कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. ७ ते १७ आणि १३ ते १८ वयोगटातील क्रिकेटपटू या कॅम्पमध्ये सहभागी होऊ शकतात. १२ ते १५ नोव्हेंबर आणि १७ ते २० नोव्हेंबर दरम्यान पुणे येथे कॅम्प होईल.