Arjun Tendulkar Out For A Duck In Debut Under-19 Match : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडूलकरने पहिल्याच सामन्यात आपले वडील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या एका विक्रमाशी बरोबरी केली आहे. सध्या अर्जुन तेंडूलकर भारताच्या १९ वर्षाखालील संघाकडून श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील दोन ४ दिवसीय कसोटी सामन्यासाठी त्याची संघात निवड झालेली होती. यानंतर आज पहिल्या डावात अर्जुनला शून्यावर बाद होण्याची वेळ आली. योगायोग म्हणजे सचिन आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे अर्जुनने सचिनच्या ‘नको त्या’ विक्रमाशी बरोबरी केली आहे.

अर्जुनने पहिल्याच सामन्यात आपला पहिला बळी मिळवला. पण त्या तुलनेची कामगिरी त्याला फलंदाजीत करता आली नाही. त्याला आपल्या पहिल्या डावात धावांचे खाते उघडता आले नाही. शाशिका दुलशान याच्या गोलंदाजीवर अर्जुन बाद झाला. ११ चेंडू खेळलेल्या अर्जुनला एकही धाव करता आली नाही. योगायोग म्हणजे पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात सचिनही शून्यावर बाद झाला होता. मात्र हा त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना नव्हता. त्याआधी सचिनने कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

दरम्यान, या सामन्यात गोलंदाजी करताना अर्जुनने श्रीलंकेच्या कमील मिशहराला पायचीत केले होते. तो त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय बळी ठरला. आपल्या संघाला पहिला बळी मिळवून देत अर्जून भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. पण अखेरीस त्याला एकाच बळीवर समाधान मानावे लागले.