“सचिन पाजी, हे मात्र बरोबर नाही”; माजी खेळाडूचं मत

पाहा नक्की काय आहे प्रकरण

करोनानंतर अखेर गेल्या आठवड्यात इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात झाली. या मालिकेत DRSवरून काही प्रमाणात टीका आणि नाराजी दिसून आली. त्या घटनेनंतर DRS मध्ये ५ टक्के जरी चेंडू स्टंपवर आदळत असेल, तर फलंदाजाला बाद ठरवण्यात यावं असं मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केलं. तसेच DRS घेतल्यानंतर Umpire’s Call हा निर्णय न देता, जो निर्णय असेल तो निर्णय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घ्यावा, असेही तो म्हणाला. यातील एका गोष्टीशी माजी खेळाडू आकाश चोप्राने सहमती दर्शवली पण एका बाबतीत मात्र सचिन बरोबर नसल्याचे मत त्याने व्यक्त केलं.

“खेळाडू पायचीत म्हणजे LBW असेल असं वाटतं तेव्हा खेळाडू अपील करतात. त्यात पंचांचा निर्णय अमान्य असेल, तर DRS ची मदत घेतली जाते. जर तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतरही पंचांच्याच निर्णयवर ठाम राहायचं असेल तर तंत्रज्ञानाचा उपयोग काय? त्यामुळे याबाबतीत सचिन अगदी बरोबर बोलतो आहे आणि मी त्याच्याशी सहमत आहे”, असे आकाश चोप्रा आपल्या आकाशवाणी या कार्यक्रमात बोलताना म्हणाला.

“सचिन पाजी, तुमची एक गोष्ट मात्र बरोबर नाही. मी त्याच्याशी सहमत नाही. ती गोष्ट म्हणजे… चेंडू कितीही टक्के स्टंपला लागत असेल तर फलंदाजाला बाद ठरवण्यात यावं. कारण आपण चेंडू स्टंपला लागेल की नाही हे प्रोजेक्शनच्या माध्यमातून पाहात असतो. इतर खेळांसारखे आपण त्याचे प्रोजेक्शन करू शकत नाही. क्रिकेटमध्ये केलेलं चेंडूचं प्रोजेक्शन हे त्याचा स्विंग, स्पिन, उसळी याचा अंदाज घेऊन होतं. त्यामुळे हे प्रोजेक्शन किती टक्के अचूक असेल याचा प्रश्न आहे. त्यामुळे तुमच्या या मताशी मी असहमत आहे”, असे त्याने सांगितले.

सचिन काय म्हणाला होता?

“चेंडूचा किती टक्के भाग स्टम्पवर आदळतो हे महत्वाचं नाही. जर DRS मध्ये चेंडू स्टम्पवर आदळत आहे असं दिसत असेल तर मैदानावरील पंचांनी फलंदाजाला नाबाद ठरवलं असलं तरीही त्याला बाद घोषित करायला हवं. क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यामागचं हेच उद्दीष्ट आहे. सध्याच्या नियमानुसार चेंडूचा ५० टक्केपेक्षा जास्त भाग स्टम्पला आदळत असेल तरच फलंदाज बाद ठरवला जातो, पण मला हे पटत नाही. हा निर्णय टेनिससारखा व्हायला हवा, एकतर चेंडू आत आहे किंवा चेंडू बाहेर आहे…मध्ये असं काहीच नसतं”, असं ब्रायन लारासोबत बोलत असताना सचिन म्हणाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sachin tendulkar drs review aakash chopra disagreement projection lbw umpires call vjb