Sachin Tendulkar Emotional Post on 2011 WC Win: २ एप्रिल २०११ ला भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियन ठरला. एम एस धोनीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने मायदेशात वानखेडे स्टेडियमवर एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद आपल्या नावे केले होते. आज या ऐतिहासिक दिवसाला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत सहा वेळा ही स्पर्धा खेळल्यानंतर २०११ मध्ये अखेरीस या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं आणि हा प्रसंग सचिनसाठी खूप भावुक करणारा होता. आज १५ व्या वर्धापनदिनानिमित्त सचिन तेंडुलकरने खास पोस्ट शेअर केली आहे आणि टीम इंडियाच्या जर्सीमध्ये फलंदाजी करत हा दिवस सेलिब्रेट केला आहे.

सचिन तेंडुलकरने २०११ विश्वचषक विजयाच्या १५व्या वर्धापनदिनानिमित्त पुन्हा एकदा भारतीय जर्सी परिधान केली आणि फलंदाजीसाठी मैदानात उतरला. धोनीच्या नेतृत्वाखाली मिळवलेला तो विजय आजही खास मानला जातो, कारण त्यानंतर भारतीय संघाने अद्याप वनडे विश्वचषक जिंकलेला नाही. वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेचा पराभव करत भारताने यजमान देश म्हणून विश्वचषक जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला होता.

सचिनसाठी हे जेतेपद पटकावणं स्वप्नपूर्तीचा क्षण होता. याआधी पाच वेळा स्पर्धेत सहभागी होऊनही त्यांना हा किताब जिंकता आला नव्हता. मात्र सहाव्या आणि अखेरच्या प्रयत्नात, आपल्या घरच्या मैदानात मुंबईत या महान फलंदाजाने विश्वचषक उंचावला आणि आपल्या कारकिर्दीला सुवर्णमुकुट चढवला.

सचिनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात मास्टर ब्लास्टर सध्याची भारतीय जर्सी घालून मैदानावर फलंदाजी करताना दिसत आहे. त्याच व्हिडिओमध्ये त्यांनी २०११ विश्वचषक विजयाच्या आठवणींनाही उजाळा दिला. यासोबतच त्यांनी एक भावनिक कॅप्शनही शेअर करत त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण करून दिली. ५१ वर्षीय सचिनने म्हटलं की २०११ हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास क्षण होता.

आणि ती धडधड त्या रात्री थांबलीच नाही…, सचिन तेंडुलकरची 2011 वर्ल्डकप विजयाबाबत भावुक पोस्ट

“पहिला चेंडू टाकला की हृदयाची धडधड वाढते… आणि त्या रात्री ती थांबलीच नाही. १५ वर्षांनंतरही तो क्षण अजूनही तसाच मनात आहे. आम्ही सगळे तरुण क्रिकेटपटू एकाच स्वप्नाने एकत्र आलो होतो, भारतासाठी विश्वचषक जिंकण्याचं. या प्रवासाचा भाग असलेल्या प्रत्येकाचं आणि सर्व चाहत्यांचं मनापासून आभार… तुम्ही तो क्षण आमच्यासोबत शेअर केला आणि तो इतका खास बनवला. जय हिंद,” असं सचिनने लिहिलं आहे.

२०११चा विश्वचषक विजय हा भारताने जिंकलेला केवळ दुसरा विश्वचषक होता. यामुळे देशाची तब्बल २८ वर्षांची प्रतीक्षा संपली. याआधी १९८३मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता, तेव्हा लॉर्ड्सच्या मैदानावर दोन वेळा विजेते ठरलेल्या वेस्ट इंडिजचा पराभव करत भारताने इतिहास रचला होता.