Sachin Tendulkar Post on Asha Bhosle death: ‘स्वरांचा स्वर्गीय प्रवास आज थांबला’, सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीत विश्वातील एक तेजस्वी तारा निखळला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आशाताईंच्या निधनानंतर अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सचिन आणि आशाताईंमधील हे जिव्हाळ्याचं नातं पाहून आज प्रत्येक चाहत्याचे डोळे पाणावले आहेत. सचिनने या महान गायिकेला अखेरचा सलाम करत त्यांचे आभारदेखील मानले आहेत.

सचिन तेंडुलकर आणि आशा भोसले यांचे अगदी घरगुती संंबंध होते. वयाच्या ९२व्या वर्षी आशा ताई सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरच्या लग्नसोहळ्याला उपस्थित होत्या. अर्जुन व सानिया या नवदांपत्याला आशीर्वाद देण्यासाठी स्वत: आशाताई पोहोचल्या होत्या. यादरम्यानचा व्हीडिओ त्यांच्या निधनानंतर व्हायरल होत आहे. कारण निधनापूर्वी आशाताईंचा अखेरचा व्हीडिओ आहे.

सचिन तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत म्हणाला, “भारतासाठी आणि जगभरातील संगीतप्रेमींसाठी आजचा दिवस अत्यंत दुःखद आहे. आमच्यासाठी आशा ताई म्हणजे कुटुंबाचाच एक भाग होत्या. आज आपण अनुभवत असलेल्या या दुःखासाठी शब्दही अपुरे वाटत आहेत. एका क्षणी मन अगदी शांत होतं, आणि दुसऱ्याच क्षणी त्यांनी आपल्याला दिलेल्या असंख्य सुरेल गाण्यांच्या आठवणींत ते हरवून जातं. जणू काळही काही क्षणांसाठी थांबून गेला आहे, असं वाटतं. पण त्यांच्या अमर गीतांमधून त्या कायम आपल्या सोबत राहतील.”

सचिन अखेरीस आशाताईंचे आभार मानत म्हणाला, “धन्यवाद ताई, आममचं आयुष्य तुमच्या प्रेमळपणाने, आणि अविस्मरणीय संगीताने भरून टाकल्याबद्दल. आशा ताई, तुमची खूप आठवण येईल.”

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी सचिन तेंडुलकरचं कायमचं कौतुक केलं आहे. आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर असताना आणि प्रसिध्दी मिळवल्यानंतरही सचिन तितकाच नम्र असल्याचं अनेकदा आशाताईंनी म्हटलं आहे. २०१३ मध्ये आशाताईंच्या पहिल्या ‘माई’ या चित्रपटाच्या संगीत प्रकाशनावेळी सचिनने उपस्थिती लावली होती. यादरम्यान त्या म्हणाल्या होत्या की सचिन नेहमीच त्यांच्यासोबत उभा राहिला आहे.

Sachin Tendulkar Post on Asha Bhosle
सचिन तेंडुलकरची आशाताईंच्या निधनानंतर भावुक पोस्ट

आशाताई या कार्यक्रमादरम्यान म्हणाल्या होत्या की, “सचिनला माझ्याबद्दल इतका आदर आहे की मी जेव्हा कधी त्याला बोलावते, तेव्हा तो कधीही ‘मी येऊ शकत नाही’ असं म्हणत नाही. सचिन जसाजसा त्याच्या जीवनात यशस्वी होत आहे, त्याप्रमाणेच अधिक नम्र होत आहे, हे उद्गार आशाताईंचे होते.