भारताच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरने स्टार सलामीवीर रोहित शर्माचे कौतुक केले आहे. "रोहित कार्यक्षमतेने संघांचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे. रोहित हा एक हुशार क्रिकेटर आहे, जो कठीण परिस्थितीत कधीही घाबरत नाही'', असे सचिन म्हणाला. २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रोहित शर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळतो. त्याने अलीकडेच न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताची जबाबदारी स्वीकारली आणि मालिका ३-०ने जिंकली. २०१३ मध्ये रोहित शर्माचे नशीब बदलले. त्याने रिकी पाँटिंगनंतर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारले. याच वर्षी त्याने टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केले होते. २००७ मध्ये त्याने वनडे आणि टी-२० मध्ये पदार्पण केले असले, तरी कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला जवळपास ६ वर्षे लागली. आता रोहित आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे, ज्याने पाच विजेतेपदे जिंकली आहेत. हेही वाचा - ‘फॅमिली मॅन’ राहुल..! ‘या’ कारणासाठी भारताचा हेड कोच बनण्यास तयार नव्हता द्रविड; दादानं ‘असं’ वळवलं मन! सचिन म्हणाला, ''रोहितसोबत झालेल्या प्रत्येक संभाषणात मला वाटते, की त्याच्याकडे स्मार्ट क्रिकेटिंग ब्रेन आहे. तो कधीही घाबरत नाही. मी पाहिले आहे की तो दबाव हाताळण्यास सक्षम आहे. तुम्ही संघाचे नेतृत्व करत असताना ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते.'' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजारांहून अधिक धावा करणाऱ्या रोहितबद्दल सचिन म्हणाला, ''त्याने आपल्या संघाला कधीच निराश केले नाही. मुंबई फ्रेंचायझीसोबतच्या कार्यकाळात रोहित योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास सक्षम आहे. कर्णधाराला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही अशा परिस्थितीत असाल जिथे संघ तुमच्याकडे पाहत असेल तर कर्णधाराने शांत राहणे आणि कृती करणे महत्वाचे आहे. मुंबई इंडियन्ससोबत असताना मी रोहितमध्ये हेच पाहिले आहे.''