Sanju Samson On Sachin Tendulkar: ‘अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने में लग जाती है’, शाहरूख खानच्या चित्रपटातील हे वाक्य संजू सॅमसनसाठी तंतोतंत खरं ठरलं आहे. ज्या फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये वर्षभर धावांचा पाऊस पाडला. पण टी-२० वर्ल्डकप सुरू होण्याआधीच कामगिरीचा आलेख घसरला. संघातील स्थान कायम राहिलं, पण प्लेईंग ११ मधून बाहेर पडावं लागलं. टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत अभिषेक शर्मासोबत सलामीवीर फलंदाज म्हणून इशान किशनला संधी देण्यात आली. त्यावेळी असं वाटलं होतं की, यावेळीही संजूचा वर्ल्डकप बाकावरच जाणार. पण टीम इंडियाने फलंदाजीक्रमात बदल केला आणि संजूला पुन्हा एकदा आपल्या आवडीच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करून, संजू सॅमसन टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा मानकरी ठरला.
भारताने न्यूझीलंडला पराभूत करून जेतेपदाची ट्रॉफी उंचावल्यानंतर संजू सॅमसन म्हणाला, “हे एखाद्या स्वप्नासारखं आहे. मी खूप आनंदी आहे. मी आत्ता खूप भावुक झालो आहे. खरंतर मी जेव्हा दोन वर्षांपूर्वी सुरुवात केली, २०२४ च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचा मी भाग होतो. पण त्यावेळी मला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आज मी जे मिळवलं आहे, तेच मला मिळवायचं होतं. मी या संघाचा भाग नव्हतो तेव्हा मला कळत नव्हतं की आता काय करायचं. पण नंतर माझी संघात निवड झाली. मी देवाचे यासाठी आभार मानतो. आमच्या माजी भारतीय खेळाडूंनी माझ्याशी संवाद साधला, मी सातत्याने सचिन तेंडुलकर यांच्या संपर्कात होतो गेल्या दोन महिन्यांपासून. मी त्यांच्याशी खूप वेळ प्रदीर्घ चर्चा केल्या आहेत. खेळाबद्दलची सविस्तर चर्चा त्यांच्याशी झाली. मला त्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलं. संघातल्या इतर खेळाडूंनीही खूप चांगली साथ दिली.
संजू सॅमसनचा सुपरहिट शो
संजू सॅमसनने गेल्या तिन्ही सामन्यांमध्ये अविश्वसनीय फलंदाजी केली आहे. भारताचा सुपर ८ फेरीतील शेवटचा सामना वेस्ट इंडिजविरूद्ध पार पडला होता. हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा होता. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने नाबाद ९७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर सेमी फायनलमध्ये इंग्लंडविरूद्ध खेळताना संजूने वादळी खेळी केली होती. संजू ८९ धावा करून माघारी परतला होता. आता अंतिम सामन्यात भारतीय संघाला चांगल्या सुरूवातीची गरज होती. या निर्णायक सामन्यात संजूने पुन्हा एकदा ८९ धावांची खेळी केली. त्याचं शतक थोडक्यात हुकलं. पण भारतीय संघाला जी सुरूवात मिळाली, त्यामुळे भारतीय संघाने २५५ धावांचा डोंगर उभारला.
भारतीय संघाचा दमदार विजय
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने २० षटकांअखेर ५ गडी बाद २५५ धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या संजू सॅमसनने सर्वाधिक ८९ धावांची खेळी केली. तर अभिषेक शर्माने ५२ धावा केल्या. तर इशान किशनने ५४ धावा केल्या. शेवटी शिवम दुबेने नाबाद २६ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या २५५ धावांवर पोहोचवली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडचा डाव १५९ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना ९६ धावांनी आपल्या नावावर केला.
