पहिल्यावहिल्या इंडियन बॅडमिंटन लीग (आयबीएल)चे आता जोरदार वारे वाहू लागले आहेत. मास्टर-ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर स्वत: या महत्त्वाकांक्षी स्पध्रेत ‘मुंबई मास्टर्स’ या संघाचा फ्रेंचायझी म्हणून समोर येण्याची शक्यता आहे. भारतीय बॅडमिंटन संघटनेतील उच्च सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुंबई मास्टर्स’ या संघाची खरेदी प्रक्रिया सुरू असून, सचिन या संघाचा मालक असण्याची शक्यता आहे.
‘‘सचिन ‘मुंबई मास्टर्स’ संघ खरेदी करण्याच्या प्रक्रियेत आहे. आयपीएलमध्ये जसा शाहरूख खान कोलकाता नाइट रायडर्सला पुरस्कृत करतो. त्याच पद्धतीने सचिन मुंबई संघाचा दर्शनी चेहरा असेल,’’ असे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी पुढे सांगितले की, ‘‘सचिन ‘मुंबई मास्टर्स’ फ्रेंचायझीचे समभाग खरेदी करण्याची शक्यता आहे. अन्य समभाग दोन किंवा तीन अन्य कंपन्या खरेदी करू शकतील. तो एक भागीदार असेल.’’
इंडियन बॅडमिंटन लीगने काही दिवसांपूर्वी ‘हैदराबाद हॉटशॉट्स’च्या रूपाने आपला पहिला संघ जाहीर केला. पीव्हीपी ग्रुपने या यशस्वीपणे ही बोली जिंकली होती. पहिल्या ‘आयबीएल’ स्पध्रेत मुंबई मास्टर्स (मुंबई), पुणे विजेता (पुणे), राजधानी स्मॅशर्स (दिल्ली), कर्नाटक किंग्ज (बंगळुरू), हैदराबाद हॉटशॉट्स (हैदराबाद)आणि लखनौ वॉरियर्स (लखनौ) असे सहा शहरांचे संघ सहभागी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. परंतु याची अधिकृत घोषणा महिन्याच्या उत्तरार्धात होईल. लखनौ फ्रेंचायझीत सहारा तर ‘पुणे विजेता’मध्ये डाबर कंपनी उत्सुक आहे. दिल्ली आणि कर्नाटक संघांच्या खरेदीमध्ये स्थावर मालमत्ता क्षेत्रामधील व्यावसायिक उत्सुक आहेत.