सांताक्रुझ येथे कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस शिपाई सुरेश ढुमसे यांनी प्रसंगावधान दाखवून अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्या महिलेचे प्राण वाचले. ती महिला सचिन तेंडूलकरची परिचित होती. त्यामुळे सचिनने स्वत: ढुमसे यांची त्यांच्या तत्परतेबद्दल आभार मानले होते. सचिनने या सुरेश ढुमसे यांची भेट घेतली.

सचिनने याबाबत ट्वीट करून वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले. सचिनचे हे ट्वीट मुंबई पोलीस या ट्विटरवर अकाऊंटवरून रिट्वीट करण्यात आले आहे. मास्टर ब्लास्टर मैदानावरील बेस्टमनला भेटला, असे या ट्वीटच्या कॅप्शनमध्ये म्हटले गेले आहे.

सुरेश ढुमसे यांच्यामुळेच सचिनच्या मैत्रिणीला सांताक्रूझ पीएसटीएन जंक्शन येथे रस्ता अपघातानंतर नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात मदत झाली. सचिनने ढुमसे यांचे कौतुक करत ट्विटरवर एक भावनिक संदेश लिहिला आहे.

हेही वाचा – पुढच्या ४ दिवसात रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला; टीम इंडियाला बदला घेण्याची सुवर्णसंधी!

नक्की काय घडले?

निरुपमा चव्हाण (४७) या ३० नोव्हेंबरला रिक्षामधून सांताक्रुझ पोलीस ठाण्याजवळून जात होत्या. त्यावेळी एका अवजड वाहनाने रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाला जोरदार धडक दिली. तो खांब चव्हाण प्रवास करत असलेल्या रिक्षावर कोसळला. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. तेथे कर्तव्यावर तैनात वाहतूक पोलीस सुरेश ढुमसे यांनी संवेदनशिलता दाखवून तात्काळ चव्हाण यांना रिक्षामध्ये बसवून नानावटी रुग्णालयात नेले. सचिनला कळाल्यानंतर त्याने प्रत्यक्ष ढुमसे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.