टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. पाकिस्तानने २९ वर्षानंतर भारताला वर्ल्डकपमध्ये पराभूत केलं आहे. यानंतर भारतीय संघाने नेमक्या काय चुका केल्या याबाबत आजी माजी क्रिकेटपटूंनी आपलं मत व्यक्त केलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पराभवाचं विश्लेषण केलं आहे.
“भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चांगला राहिला. पाकिस्तानचा संघ खरंच चांगला खेळला. भारतासाठी हा सामना खरंच कठीण होता. दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना मैदानात दवही पडलं होतं. ही सर्व कारणं आहेतच. पण आपली धावसंख्या कमी पडली. आपण २०-२५ धावांनी कमी पडलो. खेळपट्टी चांगली होती. या खेळपट्टीवर चेंडू जास्त उसळत नव्हता. तसेच फिरतही नव्हता. शाहिन आफ्रिदीने सुरुवातीलाच भारताला धक्के दिले. रोहित शर्माला पहिल्या षटकात बाद केलं. त्यानंतर दुसऱ्या षटकात केएल राहुलला तंबूचा रस्ता दाखवला. हे दोघंही शाहिनच्या गोलंदाजीचा सामना करताना योग्य पोझिशनमध्ये नव्हते. १४० च्या गतीने चेंडू टाकताना गोलंदाज स्विंग आणि स्टम्पमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये शाहिन आफ्रिदी यात चांगला आहे. काही चांगले गोलंदाज आहेत. ते योग्य ठिकाणी यॉर्कर चेंडू टाकतात.कारण या चेंडूसाठी फलंदाज तसा तयार नसतो. फलंदाज गुड लेंथवर फोकस करून असतो. हेच शाहिननं केलं. हसन अली, रौफ, शादाब आणि हाफिज या सर्वांनी चांगली गोलंदाजी केली.”, असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सांगितलं.




“भारतीय संघ बऱ्याच कालावधीनंतर पाकिस्तानसोबत खेळला. त्यामुळे गोलंदाजी समजण्यासाठी फलंदाजांनी वेळ घेतला. आपण ३ गडी झटपट गमावले. सुर्यकुमार आला आणि चांगले फटके मारले. ऋषभ पंत आणि विराट कोहली दरम्यान चांगली भागीदारी केली.पण आपण चुकीच्या वेळी गडी गमावले.”, असंही सचिन तेंडुलकरने पुढे सांगितलं. “सर्वांनाच माहिती आहे ऋषभला षटकार मारणं किती आवडतं. पण शादाब विरुद्ध खेळताना ऋषभ पंतने चांगली योजना आखली.” असं सचिन तेंडुलकरने सांगितलं.
“बाबर आझम आणि रिझवानने सातत्याने स्ट्राईक बदलत राहिले. काही चेंडूंवर त्यांनी मोठे फटकेही मारले. जर सुरुवातीला गडी बाद करण्यात यश मिळालं असतं तर कदाचित दबाव वाढला असता. पण पाकिस्तानने चांगली फलंदाजी केली. चेंडू पाहिजे तितका स्विंग झाला नाही. दवही पडलं होतं.सातव्या आणि आठव्या षटकात जर गडी बाद करण्यात यश मिळालं असतं तर सामन्यात आलो असतो. पण तसं झालं नाही. ९ षटकात बाबरने जडेजाला षटकार मारला आणि दबाव कमी झाला. त्यानंतर १० व्या षटकात चांगल्या धावा आल्या. ही दोन षटकं महत्वाची ठरली.” असंही सचिन तेंडुलकरने पुढे सांगितलं. “ही स्पर्धेची सुरुवात आहे. भारतीय संघ नक्कीच पुनरागमन करेल आणि आपल्या आशा असलेल्या निकाल लागेल, असंही सचिन तेंडुलकरने सांगितलं.