Sachin Tendulkar On Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं. पण त्याला या मालिकेतील ५ पैकी २ सामने खेळण्याची संधी मिळाली. यापैकी एका सामन्यात तो अर्धशतकाच्या अगदी जवळ पोहोचून माघारी परतला होता. आता १९ नोव्हेंबरपासून कतारमध्ये इमर्जिंग एशिया कप स्पर्धेचा थरार सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी वैभव सूर्यवंशीला भारतीय अ संघात स्थान देण्यात आलं आहे. याआधी झालेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी त्याला ईस्ट झोन संघात स्थान दिलं गेलं होतं. यासह संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली होती. याबाबत सचिन तेंडुलकरला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सचिनने काय उत्तर दिलं? जाणून घ्या.
भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने रेडिटच्या प्रश्नोत्तरांच्या सत्रात सहभाग घेतला होता. यादरम्यान चाहत्यांनी सचिनला अनेक प्रश्न विचारले आणि सचिननेही या प्रश्नांची उत्तरं दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या वैभव सूर्यवंशीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे एका चाहत्याने सचिनला वैभवच्या नेतृत्वाबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना सचिनने लिहिले की, “मला वाटतं वैभव सूर्यवंशीला उपकर्णधार बनवण्याचा निर्णय थोडा घाईघाईत घेतलेला वाटतो. आपण त्याला रेड बॉल क्रिकेटमध्ये अजून सामने खेळण्याची संधी दिली पाहिजे आणि एका वेळी एक पाऊस टाकत पुढे गेले पाहिजे.”
बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलेल्या भारतीय अ संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी तिलक वर्माकडे सोपवण्यात आली आहे. या संघात संजू सॅमसनला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे अभिषेक शर्मा आणि वैभवची जोडी डावाची सुरूवात करताना दिसेल. या स्पर्धेत वैभवला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. यासह संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी रजत पाटीदारकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासह सचिने तेंडुलकरला जो रूटच्या रेकॉर्डबाबतही प्रश्न विचारण्यात आला होता. एका चाहत्याने विचारले की, “जो रूट तुमच्या कसोटी क्रिकेटच्या रेकॉर्डच्या अगदी जवळ पोहोचला आहे, तुमच्यासोबत एकाच पंक्तीत नाव घेतलं जाणं हेच माझ्यासाठी पुरेसे आहे, असे स्वत: रूट म्हणाला होता, यावर तुमचे मत काय?” यावर उत्तर देताना सचिनने लिहिले, “मी नेहमीच त्याला उच्च दर्जाचा फलंदाज मानत आलो आहे. तो क्रिकेट विश्वात चमकदार कामगिरी करणार हे मला त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात स्पष्टपणे जाणवले होते.”
