Sachin Tendulkar Post on Virat Kohli Test Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा रनमशीन विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला अलविदा केलं आहे. विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत कसोटीमधून निवृत्त होत असल्याचे सांगितले. अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी विराटच्या कसोटी निवृत्तीबाबत आश्चर्य व्यक्त केलं. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भावनिक पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
कोहलीच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे क्रिकेट जगताला नक्कीच धक्का बसला आहे. त्याची पत्नी अनुष्कासह अनेक महान क्रिकेटपटूंनी विराटबद्दल भावनिक पोस्ट लिहिल्या. यापैकी एक नाव ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरचे आहे, विराट कोहली सचिन तेंडुलकरला आपला आदर्श मानतो. विराटच्या कसोटी निवृत्तीबाबत लिहिताना सचिनला त्याचा अखेरचा कसोटी सामनाही आठवला.
सचिन तेंडुलकरने विराट कोहलीचा पोस्ट करत खाली कॅप्शनमध्ये लिहिले, “तू कसोटीमधून निवृत्त घेत आहेस, यादरम्यान तुझ्या १२ वर्षांपूर्वीच्या त्या कृतीची आठवण करून देतो. माझ्या अखेरच्या कसोटीत तू मला तुझ्या दिवंगत वडिलांनी दिलेला धागा गिफ्ट म्हणून दिला होतास. तू देत असलेलं ते गिफ्ट स्वीकारणं माझ्यासाठी खूप अवघड होतं. पण तुझी ती कृती हृदयस्पर्शी होती आणि जे माझ्याबरोबर अजूनही आहे.”
सचिन तेंडुलकर पुढे म्हणाला, “भले मी तुला त्याबदल्यात कोणता धागा दिला नसेल. पण कृपया एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि कौतुकाचे बोल कायम तुझ्याबरोबर आहेत. विराट तू असंख्य तरूण क्रिकेटपटूंना हा खेळ खेळण्यासाठी प्रेरित केलं आहेस आणि हा तुझा खरा वारसा आहे.”
सचिनने शेवटी म्हटलं, “तुझी कसोटी कारकीर्द खूप कमालीची होती. तू फक्त भारतीय क्रिकेटसाठी धावाच केल्या नाहीस. तर भारतीय क्रिकेटला नव्या पिढीतील कमालीचा प्रेक्षक वर्ग आणि खेळाडू दिले आहेस. तुझ्या या स्पेशल कसोटी कारकिर्दीसाठी खूप शुभेच्छा.”
विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला त्याच्या वडिलांनी दिलेला धागा भेट म्हणून दिला होता, हा किस्सा सचिनने अनेकदा त्याच्या मुलाखतींमध्ये सांगितला आहे. सचिन तेंडुलकरचे अनेक विविध विक्रम विराट कोहलीने आपल्या नावे केले आहेत.