केवळ क्रीडापटू नव्हे तर माणूस म्हणूनही अनुकरण करावे असा वारसा सचिन तेंडुलकरने जपला आहे. त्याच्याकडून हा वारसा आपल्याला मिळाला आहे, त्याची जपणूक करणे आणि स्वत:ला घडवणे हे आपल्या हातात आहे असे मत प्रसिद्ध धावपटू योहान ब्लेकने व्यक्त केले. सचिनची कीर्ती भौगौलिक सीमांच्या पल्याड आहे. त्याच्याबद्दल बोलायला मिळणे हे सन्मान असल्याचे ब्लेक पुढे सांगतो. एवढा महान क्रिकेटपटू असूनही सचिनची विनम्रता थक्क करणारी आहे. त्याने दिलेला हा वारसा जगभरातल्या माणसांपर्यंत गेला आहे. त्याच्या पाऊलखुणांनुसार मार्गक्रमण करणे आपल्या हातात आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये दोन रौप्यपदकप्राप्त योहान ब्लेक उसियन बोल्टप्रमाणेच क्रिकेटची आवड आहे. ब्लेक सचिनचा मोठा चाहता असून, सचिनला एकदा गोलंदाजी करण्याची त्याची इच्छा आहे.
सचिनशी पहिल्यांदा बोलण्याची संधी मिळाली तो क्षण मला आजही आठवतो. त्यावेळी तुला गोलंदाजी करायची आहे असे मी त्याला सांगितल्याचे ब्लेकने सांगितले. त्याला भेटणे हा माझ्यासाठी सन्मान होता. लहानपणापासूनचा सचिन हा माझा आदर्श होता.
व्यस्त वेळापत्रक असूनही ब्लेक वेळात वेळ काढून सचिनचा खेळ पाहतो. तेंडुलकरच्या खेळींच्यी डीव्हिडींचा संग्रह घरी असल्याचेही ब्लेकने सांगितले. सचिनच्या निवृत्तीबाबत विचारले असता ब्लेक म्हणतो, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा कधी ना कधी शेवट होणार असतो. त्याने केवळ त्याच्या देशासाठी नाही तर जगासाठी अमूल्य योगदान दिले आहे. २०० कसोटी सामने आणि १५,००० धावा हे अचंबित करणारे आकडे आहेत. यासाठी सचिनला माझा सलाम आहे.