Sachin Tendulkar Praised Krunal pandya Ball: आयपीएल २०२६ चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला जात आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि संघासाठी हा नियम एकदम योग्य ठरला. आरसीबीच्या गोलंदाजांनी गुजरातच्या फलंदाजीला सुरूंग लावला आणि संघाला अवघ्या १५५ धावा करू दिल्या. आरसीबीच्या वेगवान गोलंदाजी त्रिकुटाने जिथे ७ विकेट्स घेतल्या. तिथे कृणाल पंड्यानेही संघाला मोठी विकेट मिळवून दिली. कृणाल पंड्याच्या या विकेट घेणाऱ्या चेंडूचं सचिनने कौतुक केलं आहे.

पॉवरप्लेमध्ये शुबमन गिल आणि साई सुदर्शन बाद झाल्यानंतर, गुजरातच्या आशा त्यांचा सर्वात अनुभवी फलंदाज, जोस बटलरवर अवलंबून होत्या. बटलरने मोठ्या सामन्यांमध्ये नेहमीच महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे, परंतु या अंतिम सामन्यात, आरसीबीचा स्टार अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याने एक असा जादुई चेंडू टाकला, ज्याने केवळ बटलरलाच गोंधळात टाकलं नाही, तर क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरकडून कौतुकाची थाप मिळवली.

अंतिम सामन्यात कृणाल पांड्याने अचूक गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार षटकांत केवळ २३ धावा दिल्या आणि गुजरातचा सर्वात मोठा मॅचविनर जोस बटलरची विकेट घेतली. जेव्हा कृणाल पांड्या गुजरातच्या डावातील १३वं षटक टाकण्यासाठी आला, तेव्हा जोस बटलर क्रीजवर आधीच स्थिरावला होता. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बटलरने पुढे सरसावत एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि कृणालच्या जादुई चेंडूवर बटलर स्टंपिग होत माघारी परतला.

खरं तर, कृणाल पांड्याने बटलरला क्रीझच्या बाहेर पाऊल टाकताना पाहताच, चतुराईने चेंडूचा वेग वाढवला आणि वाईड यॉर्कर लेंथवर टाकला. बटलरने शेवटच्या क्षणी चेंडूपर्यंत पोहोचून तो कट करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटला लागून थेट यष्टीरक्षकाकडे गेला. यष्टीमागे असलेल्या जितेश शर्माने कोणतीही चूक न करता बटलरला यष्टीचीत केले.

अगदी महान सचिन तेंडुलकरलाही कृणाल पंड्याच्या क्रिकेटमधील कौशल्याचे आणि अचूक लाईन लेंथचं कौतुक करण्याचा मोह आवरता आला नाही. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कृणालच्या गोलंदाजीचे कौतुक करत लिहिलं, “कृणाल पंड्याचा काय अप्रतिम चेंडू होता! चेंडू रिलीज करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याने फलंदाजाच्या पायांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवलं आणि मग त्याला ड्रेसिंग रूममध्ये परत पाठवण्यासाठी एक अचूक चेंडू टाकला.”