१६ एप्रिलला वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवला गेला. हा सामना पंजाब किंग्सने जिंकला असला तरी विजयापेक्षा श्रेयस अय्यरच्या कॅचची सर्वाधिक चर्चा आहे. श्रेयस अय्यरने हार्दिक पंड्याला झेलबाद करण्यासाठी त्याने सीमारेषेजवळ आजवर कधीच पाहिला नसेल असा कमालीचा झेल टिपला. श्रेयस अय्यरच्या या कॅचची इतकी चर्चा आहे की खुद्द सचिन तेंडुलकरने पोस्ट करत त्याचं कौतुक केलं आहे.
पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे हार्दिक पंड्या बाद झाला, ज्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ २०० धावांचा पल्ला गाठण्यात अपयशी ठरला. हार्दिकने मोठा फटका खेळलेला चेंडू सीमारेषा ओलांडण्यापूर्वीच अय्यरने तो पकडून झेवियर बार्टलेटकडे फेकला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने श्रेयस अय्यरच्या या रिले कॅचचे कौतुक केले आणि आपण प्रत्यक्ष पाहिलेल्या ‘सर्वोत्कृष्ट कॅचपैकी एक’ असल्याचं म्हटलं.
सचिन तेंडुलकरने त्या झेलचं सविस्तर विश्लेषण केलं. त्याने श्रेयसच्या या कॅचचा व्हीडिओ शेअर केला आणि लिहिलं, “श्रेयस अय्यरचा झेल केवळ त्याच्या चपळतेमुळेच नाही, तर त्याच्या सतर्कतेमुळेही खास ठरतो. त्याला चेंडूचा वेग, लांबी आणि सीमारेषा कुठे आहे याचा अंदाज घेऊन योग्य वेळी झेप घेतली. त्याने हवेतच चेंडू पकडला आणि तो जमिनीवर पडण्यापूर्वीच सहकाऱ्याकडे फेकला. क्षेत्ररक्षक नेमका कुठे आहे हे त्याला अचूक माहित होतं.”
हे सर्व एका क्षणात टिपण्यासाठी प्रचंड जागरूकता, अचूक वेळ, शारीरिक क्षमता आणि शांत मन लागतं. श्रेयस अय्यरने हे सर्व अगदी अचूक केलं. मी आतापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम कॅचपैकी हा एक आहे!, असं अखेरीस सचिन तेंडुलकर म्हणाला.
ही घटना मुंबई इंडियन्सच्या डावाच्या १८व्या षटकात घडली. पंड्याने मार्को यान्सनच्या तिसऱ्या चेंडूवर सरळ फटका मारला. श्रेयस अय्यर लाँग-ऑनवरून धावत आला आणि त्याने हवेत झेप घेऊन झेल घेतला. चेंडू सीमारेषेबाहेर जाण्यापूर्वी हवेत झेप घेतली आणि त्याने चेंडू झेवियर बार्टलेटकडे फेकला. रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.
दुखापतीमुळे रोहित शर्मा पंजाब किंग्सविरुद्धच्या आयपीएल २०२६ च्या २४ व्या सामन्यातून बाहेर पडला. त्याच्या जागी क्विंटन डी कॉकने मैदानात उतरून मोसमाच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं. डी कॉकने आपल्या शतकाने रोहित, संजू आणि पंत यांचे मोठे विक्रम मोडले आहेत.
