Sachin Tendulkar Praises Vaibhav Sooryavanshi Inning: १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरलाही आपल्या फटकेबाजीने भुरळ घातली आहे. आयपीएल २०२६ एलिमिनेटरमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळलेल्या वैभव सूर्यवंशीच्या तुफानी खेळीचं सचिनने भरभरून कौतुक केलं. वैभवच्या फलंदाजीतील टेक्निक आणि निर्भीड शैलीने प्रभावित झालेल्या सचिनने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत युवा फलंदाजाचं अभिनंदन केलं. यादरम्यान त्याच्या खेळीतील बारकावे मास्टर ब्लास्टरने हेरले.

प्रथम फलंदाजी करताना, राजस्थान रॉयल्सने २० षटकांत ८ गडी गमावून २४३ धावा केल्या. १५ वर्षीय सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीने केवळ २९ चेंडूंमध्ये तब्बल ३३ च्या स्ट्राईक रेटने शानदार ९७ धावा करून राजस्थानला या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वैभवने सर्वांनाच आपल्या फटकेबाजीची भुरळ घातली.

वैभव सूर्यवंशी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद शतक करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. त्याला २९व्या चेंडूवर शतक पूर्ण करण्यासाठी फक्त तीन धावांची गरज होती. जर त्याने हा पराक्रम केला असता, तर त्याने ख्रिस गेलचा २०१२ मधील सर्वात जलद आयपीएल शतकाचा (३० चेंडू) विक्रम मोडला असता. पण नशीबाने त्याला साथ दिली नाही. एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या कडेला लागून थर्ड मॅनकडे गेला आणि वैभव ९७ धावांवर बाद झाला. पण त्याच्या या खेळीने मात्र सर्वांना मंत्रमुग्ध केलं.

सचिनने अचूक शब्दांत मांडलं वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचं गणित!

सचिन तेंडुलकरने वैभव सूर्यवंशीसाठी केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, “वैभव सूर्यवंशीचा बॅट स्विंग कमालीचा आहे. त्याहूनही खास गोष्ट म्हणजे, लेग साइडला येणाऱ्या चेंडूंवर तो ज्या सुंदर पद्धतीने फ्रंट फुट बाजूला काढून स्वतःसाठी जागा तयार करतो, ते पाहण्यासारखं आहे. त्यामुळे त्याला स्वतःचा नैसर्गिक खेळ खेळण्याचं स्वातंत्र्य मिळतं. त्याची ही खेळी खरोखरच थक्क करणारी होती!”

आपल्या पोस्टमध्ये सचिन तेंडुलकरने वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीतील काही खास तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकला. विशेषतः त्याचा बॅट स्विंग आणि क्रीजवरील हालचाल सचिनला खूप भावली. लेग साइडला येणाऱ्या चेंडूंवर फ्रंट फुट सुंदरपणे बाजूला काढत तो स्वतःसाठी जागा तयार करतो आणि त्यामुळे मैदानाच्या विविध भागात सहज आक्रमक फटके खेळू शकतो, असं सचिनने नमूद केलं.

विशेष म्हणजे, हे कौतुक क्रिकेट इतिहासातील महान फलंदाजाडून आल्यानं त्याचं महत्त्व आणखी वाढलं आहे. वैभव सूर्यवंशीची ही खेळी आयपीएल २०२६ मधील सर्वात चर्चेचा विषय ठरली आहे. त्याने अवघ्या २९ चेंडूत ९७ धावांची वादळी खेळी करत शतक थोडक्यात हुकलं, पण या खेळीदरम्यान अनेक विक्रम आपल्या नावावर केले.