Sachin Tendulkar April Fool Prank: भारताचा मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा फलंदाज सचिन तेंडुलकरने २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलं होतं. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तो आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करून १३ वर्षे उलटली आहेत, पण त्याचा क्रेझ अजूनही कमी झालेला नाही. सचिन क्रिकेटच्या मैदानावर फार कमी वेळेस दिसून येतो, पण सोशल मीडियावर तो प्रचंड सक्रीय असतो. नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात तो आपल्या मित्रासोबत प्रँक करताना दिसून येत आहे.
सचिनने १ एप्रिलला ‘एप्रिल फूल डे’च्या दिवशी आपल्या जुन्या मित्राची मजेशीर फिरकी घेतली. एप्रिल फूल डेचा दिवस हा विनोद, मस्करी आणि गंमतीशीर युक्त्यांनी साजरा केला जातो. यादिवशी लोकं काही अशा खोट्या आणि मजेशीर गोष्टी सांगतात, ज्या लोकांना खऱ्या वाटतात. यासह काही लोकं प्रँक करतात. एकदा का प्रँक पूर्ण झाला, की ते व्यक्ती समोरच्या व्यक्तीला एप्रिल फूल म्हणून चिडवतात. असाच काहीसा प्रँक सचिनने आपल्या मित्रासोबत केला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सचिन तेंडुलकरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सचिनने आपल्या मित्रासोबत प्रँक केला आहे. सचिनचा डुप्लिकेट व्हॅनिटीमध्ये खुर्चीवर आरामात बसलेला असतो. सचिनचा मित्र तिथे आला, त्याला वाटले की तो सचिनच आहे. म्हणून त्याने त्याला मागून मिठी मारली. पण नेमकं तेव्हाच तो डुप्लिकेट अचानक उठतो आणि त्याच्या मित्रावर चिडण्याचं नाटक करतो. त्यावेळी सचिनचा डुप्लिकेट म्हणतो, “कोण आहात तुम्ही? तुम्ही मला स्पर्श कसं केलं?…” हे ऐकताच सचिनचा मित्र घाबरतो. नेमकं तेव्हाच खरा सचिन समोर येतो आणि जोरजोरात हसू लागतो. हे पाहून सचिनच्या मित्राला आश्चर्याचा धक्का बसतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.
सचिन तेंडुलकर सध्या मुंबई इंडियन्स संघाचा सपोर्ट स्टाफमधील सदस्य आहे. सचिनने २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. ६६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने ४८.५२ च्या सरासरीने फलंदाजी करताना ३४३५६ धावा केल्या. यादरम्यान त्याने १०० शतकं आणि १६४ अर्धशतकं झळकावली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृ्त्ती जाहीर केल्यानंतर सध्या तो सचिन तेंडुलकर फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य करण्यात आणि युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात व्यस्त आहे.
