सचिन तेंडुलकर हा भारताचा एक महान क्रिकेटपटू. भारतीय संघाला अनेक महत्वाचे विजय मिळवून देण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला. टीम इंडियाला सचिन सारखा महान क्रिकेटपटू देणाऱ्या रमाकांत आचरेकर सर यांचे गेल्या वर्षी निधन झाले. पण सचिनने गुरुपौर्णिमेच्या दिवसाचे औचित्य साधून ट्विटरवरून त्यांना मानवंदना वाहिली.

सचिनने आचरेकर सर आणि त्याचा स्वतःचा फोटो ट्विट केला. त्यात त्याने लिहीले आहे की गुरु हा शिष्याच्या आयुष्यातील अंधःकार आणि अहंकार दूर करतो. आचरेकर सर, मी आज जो काही आहे ते फक्त तुमच्यामुळेच! माझे गुरु आणि मार्गदर्शक आचरेकर सर यांना मनापासून धन्यवाद आणि विनम्र अभिवादन. तसेच त्याने “गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ॥” हा गुरुची महती सांगणारा श्लोकदेखील ट्विट केला आहे.

प्रशिक्षक रमांकात आचरेकर यांचे जानेवारी महिन्यात वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनाच्या काही दिवस आधी त्यांची तब्येत खालावली होती. त्यांना जेवताना त्रास होत असल्यामुळे अन्न पातळ करुन भरवले जात होते. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली होती. भारताला ‘क्रिकेटचा देव’ देणारे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्यावर शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये मुंबईतील अनेक क्रिकेटपटू आणि जाणकार उपस्थित होते. यावेळी सचिनने आपले गुरु आचरेकर सर यांच्या पार्थिवाला खांदा दिला होता. यावेळी सचिन आणि सारेच क्रिकेटरसिक अत्यंत भावुक झाले होते.