इंग्लंडचा स्टार अनुभवी फलंदाज जो रूट मॉर्डन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचे काही मोठे रेकॉर्ड मोडून काढण्यासाठी जो रूटला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. जो रूट हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. दरम्यान ज्यावेळी सचिन तेंडुलकरला रूटबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी सचिनने मोठं वक्तव्य केलं आहे.
सचिन तेंडुलकरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘रेडीट’ एका प्रश्नोत्तरांच्या एका सत्रात जो रूटबाबत मोठं वक्तव्यं केलं. रेडीटवर एका चाहत्याने सचिनला विचारलं की, “जो रूट तुमच्या कसोटी क्रिकेटच्या रेकॉर्डच्या अगदी जवळ पोहोचला आहे, तुमच्यासोबत एकाच पंक्तीत नाव घेतलं जाणं हेच माझ्यासाठी पुरेसे आहे, असे स्वत: रूट म्हणाला होता, यावर तुमचे मत काय?” यावर उत्तर देताना सचिनने लिहिले, “मी नेहमीच त्याला उच्च दर्जाचा फलंदाज मानत आलो आहे. तो क्रिकेट विश्वात चमकदार कामगिरी करणार हे मला त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात स्पष्टपणे जाणवले होते.”
जो रूटने डिसेंबर २०१२ मध्ये भारतीय संघाविरुद्ध खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. नागपूरमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकरही भारतीय कसोटी संघाचा भाग होता. या सामन्यात जो रूटने अनुभवी फिरकी गोलंदाजांचा सामना करत संयमी खेळी करत धावा केल्या होत्या. त्यावरूनच सचिनला रूटच्या असामान्य क्षमतेची खात्री पटली होती.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने १५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. सचिनच्या पाठोपाठ रूट १४ हजारांहून अधिक धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. येत्या काही वर्षांत रूट सचिनला मागे टाकून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचू शकतो. सचिनचा विक्रम मोडण्याच्या यादीत नाव येणं हिच मोठी गोष्ट आहे, असं रूट म्हणाला होता. आता सचिननेही त्याचं कौतुक केलं आहे.
