Sachin Tendulkar on Turning Point of India win: भारताने टी-२० विश्वचषक सामन्यात पाकिस्तानचा तब्बल ६१ धावांनी दणदणीत पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने सुपर-८ फेरीत धडक मारली आहे. दोन्ही डावांमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली, ज्यामुळे टीम इंडियाचा विजय अधिक सोपा झाला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारताच्या विजयानंतर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने भारताच्या विजयाचा टर्निंग पॉईंट सांगितला.

प्रथम फलंदाजी करताना, इशान किशनच्या स्फोटक खेळीच्या बळावर टीम इंडियाने १७५ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात भारताच्या गोलंदाजीत कमालीच्या सुरूवातीमुळे पाकिस्तानचा संघ फक्त ११४ धावांवर सर्वबाद झाला. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर इशान किशनने भारताचा डाव सावरला. इशानने फक्त ४० चेंडूत १० चौकार व ३ षटकारांसह ७७ धावांची खेळी केली. त्याच्या फटकेबाजीमुळे भारताने पॉवरप्लेमध्ये मोठी धावसंख्या उभारली.

इशानने फक्त २७ चेंडूत त्याचं अर्धशतक पू्र्ण केलं आणि संघाला चांगल्या धावसंख्येचा पाया रचून दिला. इशान बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रिंकू सिंह व शिवम दुबे यांनी भारताला १७५ धावांपर्यंत पोहोचवलं. तर फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर जसप्रीत बुमराह व हार्दिक पंड्या यांनी पहिल्या दोन षटकांत ३ विकेट्स घेत दणक्यात सुरूवात केली. तर नंतर अक्षर पटेल, कुलदीप व वरूण या फिरकीच्या त्रिकुटाने पाकिस्तानच्या फलंदाजांना झटपट माघारी पाठवलं.

काय ठरला भारताच्या पाकिस्तानविरूद्ध विजयाचा टर्निंग पॉईंट?

सचिन तेंडुलकरने भारताच्या विजयानंतर पोस्ट करत लिहिलं, “पॉवरप्लेमध्येच भारताने सामन्यावर पकड मजबूत केली आणि तिथूनच सामना प्रतिस्पर्ध्यांच्या हातातून निसटला. पहिल्या डावात इशान किशनने दिलेली आक्रमक सुरुवात आणि दुसऱ्या डावात पाहायला मिळालेली अचूक व शिस्तबद्ध गोलंदाजी, यामुळेच भारताचा विजय सोपा झाला. संपूर्ण सामन्यात भारतच वरचढ दिसत होता; आपण कायमच ड्रायव्हिंग सीटवर होतो. एकूणच आजच्या सामन्यात भारताने जबरदस्त कामगिरी करत मैदान गाजवलं.”

भारताकडून गोलंदाजीत सर्व गोलंदाजांनी विकेट्स मिळवल्या. पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज उस्मान खानने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण अक्षर पटेलच्या कमालीच्या चेंडूवर इशानने त्याला स्टंपिंग करत ४४ धावांवर माघारी धाडलं. तर शाहीन आफ्रिदीने अखेरच्या षटकांमध्ये २३ धावांची खेळी केली. याशिवाय कोणताही फलंदाज १५ धावांचं योगदानदेखील देऊ शकला नाही.

Sachin Tendulkar Post on India Win vs Pakistan
भारताच्या पाकिस्तानवरील विजयानंतर सचिन तेंडुलकरची पोस्ट

भारताकडून या सामन्यात तिलक वर्मा व रिंकू सिंह यांनीदेखील गोलंदाजी केली. तिलक वर्माने येताच पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली. तर बुमराह, हार्दिक, अक्षर व वरूण या जोडीने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर कुलदीपने एक विकेट घेतली.