भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची २४ वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द अतुलनीय होती. या काळात त्याने अनेक विक्रम मोडले आणि अनेक नवीन विक्रम तयार केले. मात्र, आजही त्याला दोन गोष्टींची खंत वाटत आहे. क्रिकेट खेळताना दोन इच्छा अपूर्ण राहल्याचे सचिनने सांगितले.

एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या सचिनने एका मुलाखतीत सांगितले, ”मी माझ्या क्रिकेट कारकीर्दीबद्दल आनंदी आहे. पण माझ्या कारकिर्दीत माझ्या दोन गोष्टी करता आल्या नाहीत यांची खंत वाटते. पहिली म्हणजे भारतीय संघात सुनील गावसकर यांच्याबरोबर खेळायला मिळाले नाही. आणि दुसरी म्हणजे माझे हिरो विव्हियन रिचर्ड्सविरूद्ध मी मैदनात कधी उतरू शकलो नाही.”

हेही वाचा – चुकीला माफी नाही! अंपायरविरुद्ध वापरली अपमानास्पद भाषा, मग ICCनं ठोठावला मोठा दंड

सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याच्या काही वर्षांपूर्वी सुनील गावसकर निवृत्त झाले होते. सचिनने १९८९मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर, विव्हियन रिचर्ड्स १९९१ला निवृत्त झाले.

हेही वाचा – अवघ्या ‘दोन’ शब्दात विराटने सांगितले धोनीसोबतचे नाते!

सचिनची कारकीर्द

सचिनने २०१३मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. त्याने आपल्या २४ वर्षांच्या कारकीर्दीत २०० कसोटी सामने, ४६३ एकदिवसीय सामने आणि एक टी-२० सामना खेळला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ३४ हजाराहून अधिक धावा केल्या. कसोटीत सचिनने ५१ शतकांसह १५९२१ तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतकांसह १८४२६ धावा केल्या. दोन्ही स्वरूपात तो सर्वाधिक धावा करणारा आहे.