रॉजर फेडरर आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. सचिन तेंडुलकर अनेकदा विम्बल्डन सामना पाहायला गेल्याचेही दिसून आले असून सचिनकडून अनेकदा टेनिसप्रेम उघडपणे व्यक्त करण्यात आले आहे. मात्र यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेत काहीसे उलट चित्र दिसले. विम्बल्डन स्पर्धेत रॉजर फेडरर आणि फ्रेंच टेनिसपटू अड्रियन मनारीनो या दोघांच्यात रंगलेल्या सामन्यात मनारीनो याने सर्व्हिस केलेला चेंडू फेडररने क्रिकेटसारखा उभ्या बॅटने रोखला. हा व्हिडीओ विम्बल्डनच्या अधिकृत ट्विटवरून ट्विट केल्यानंतर खुद्द आयसीसीने फेडररला कसोटी क्रिकेटमधील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असल्याची पावती दिली.

यात भर म्हणून सचिननेही फेडररचे हा व्हिडीओ पाहून कौतुक केले. हात आणि डोळे यांचा उत्तम समन्वय साधत तू हा शॉट खेळला आहेस. त्याबाबत तुझे अभिनंदन. आता आपण एकमेकांकडून क्रिकेट आणि टेनिसचे धडे घ्यायला हवेत, असे सचिनने यावर ट्विट केले. तू तुझे नववे विम्बल्डन विजेतेपद जिंकल्यावर आपण सुरुवात करू या, असेही त्याने नमूद केले.

या ट्विटची दखल घेत फेडररनेही हजरजबाबी वृत्ती दाखवत सचिनला उत्तर दिले. ही स्पर्धा संपण्याची वाट का पाहायची? मी तर आताही तुझ्याकडून क्रिकेटचे धडे घायला तयार आहे, असे ट्विट त्याने केले.

दरम्यान, या ट्विटला आणि उत्तराला क्रीडाप्रेमींची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली. अनेकांनी या दोन दिलदार खेळाडूंवर त्यासारख्या नम्रपणाबद्दल स्तुतिसुमनेही उधळली.