Sachin Tendulkar Post: भारतीय संघाने इतिहासाला गवसणी घातली आहे. आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही बलाढ्य संघ आमनेसामने होते. या सामन्यातील पहिल्या चेंडूपासून ते शेवटच्या चेंडूपर्यंत भारतीय खेळाडूंनी सामन्यावर मजबूत पकड बनवून ठेवली. भारताने न्यूझीलंडला विजयासाठी २५६ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव १५९ धावांवर आटोपला. यासह भारताने सलग दुसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. या विजयानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय संघाच्या विजयानंतर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. सचिनने भारतीय संघाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने लिहिले की, “ सलग दोन वेळा टी -२० वर्ल्डकप जिंकणं, भारतीय संघ टी -२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच संघ ठरला आहे. या ट्रॉफीवर तुमचा हक्क होता आणि तुम्ही जेतेपदासाठी पात्र आहात. शाब्बास टीम इंडिया.. जय हिंद.”
भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय
हा विजय भारतासाठी खूप खास आहे. कारण भारतीय संघाने हा वर्ल्डकप जिंकून अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने लागोपाठ दुसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे. याआधी कुठल्याही संघाला लागोपाठ २ वेळा ही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. यासह भारतीय संघ तिसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावणारा जगातील पहिलाच संघ ठरला आहे. आणखी एक रेकॉर्ड म्हणजे, मायदेशात कुठल्याच संघाला टी -२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकता आली नव्हती. पण भारताने हे करून दाखवलं आहे.
या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २५५ धावांचा डोंगर उभारला. भारताकडून संजू सॅमसन पुन्हा एकदा चमकला. संजूने ८९ धावांची दमदार खेळी केली. तर इशान किशन आणि अभिषेक शर्माने देखील दमदार अर्धशतकं झळकावली. न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी २५६ धावा करायच्या होत्या. पण न्यूझीलंडचा डाव १५९ धावांवर आटोपला. यासह भारताने हा सामना ९६ धावांनी आपल्या नावावर केला.
