Sachin Tendulkar shares special post on Ajinkya Rahane retirement: अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच भारतीय क्रिकेटमधील अजून एक पर्वाचा अंत झाला. शांत स्वभाव, संयमी फलंदाजी आणि संकटाच्या काळात संघाला सावरण्याची क्षमता यामुळे रहाणेने कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने भारतीय संघासह देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधीत्त्व केलं आहे. अजिंक्यच्या निवृत्तीनंतर दिग्गज खेळाडू आणि त्याचा सहकारी सचिन तेंडुलकरने खास शुभेच्छा दिल्या आहेत.
अजिंक्य रहाणेने २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नियमित कर्णधाराच्या अनुपस्थितीत भारताला ऐतिहासिक बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकून देत आपल्या नेतृत्वाची छाप उमटवली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली भारताने ऐतिहासिक गाबाच्या मैदानावर विक्रमी विजय मिळवत मालिक आपल्या नावे केली होती. अनेक संस्मरणीय खेळी आणि संघासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानामुळे रहाणेचं नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायम आदराने घेतलं जाईल.
अजिंक्य रहाणेचा संघ सहकारी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या निवृत्तीनंतर त्याला शुभेच्छा देत त्याचं कौतुक केलं आहे. अजिंक्य रहाणेच्या स्वभावाचं आणि त्याच्या गुणांचं कौतुक करत सुरूवातीपासून संघासाठी व खेळाप्रति असलेली त्याची तत्परता सचिनने या पोस्टमध्ये सांगितली आहे.
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर सचिन तेंडुलकरची खास पोस्ट
सचिन तेंडुलकर अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर पोस्ट शेअर करत म्हणाली, “अजिंक्य रहाणे, तुझ्या शानदार आंतरराष्ट्रीय कारकिर्दीसाठी मनःपूर्वक अभिनंदन! मुंबईकडून आपण पहिल्यांदा एकत्र फलंदाजी केली, तेव्हाच मला जाणवलं होतं की, तू कधीही प्रसिद्धी किंवा मोठ्या क्षणांच्या मागे धावणारा खेळाडू नव्हतास. संघासाठी कठोर मेहनत करण्याची तुझी तयारीच त्या मोठ्या क्षणांना तुझ्यापर्यंत घेऊन आली. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक मालिकाविजयातही हाच गुण सर्वाधिक ठळकपणे दिसून आला. शांतता आणि संयम हे आक्रमकतेच्या विरोधात नसतात, उलट त्याच गुणांमुळे संपूर्ण संघ निर्भयपणे खेळण्याचा आत्मविश्वास मिळवतो, हे तू सिद्ध करून दाखवलंस.”
“तुझ्या या संस्मरणीय कारकिर्दीसाठी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन! पुढील आयुष्यासाठी तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला मनःपूर्वक शुभेच्छा,” असं मास्टर ब्लास्टरने अखेरीस म्हणत शुभेच्छा दिल्या.
