Sachin Tendulkar on IPL Rules: आयपीएल २०२६ मध्ये फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. प्रत्येक सामन्यात गोलंदाजांची धुलाई पाहायला मिळाली आहे. षटकार आणि चौकारांच्या आतषबाजीसह अनेक विक्रम पाहायला मिळाले. पण सचिन तेंडुलकर या सगळ्यावर नाराज आहे. त्याच्या मते आयपीएलमध्ये संतुलनाची गरज आहे आणि हे संतुलन साधण्यासाठी या महान खेळाडूने तीन नियम सुचवले आहेत. जर बीसीसीआयने हे नियम लागू केले, तर गोलंदाज आणि फलंदाजांमधील लढत आणखी रोमांचक होईल. जाणून घेऊया, सचिनने कोणत्या नियमांमध्ये बदल सुचवला आहे.

सचिन तेंडुलकरने आयपीएलमधील सध्याच्या घडीला गोलंदाजांची होत असलेली धुलाई पाहून चिंता व्यक्त करताना दिसला. आयपीएलमध्ये संतुलनाची गरज असल्याचं सचिनने सांगितलं. क्रिकइन्फो अवॉर्ड्समध्ये सचिनने या नियम बदलांविषीय सांगितलं. यादरम्यान मास्टर ब्लास्टरने इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाकण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला.

क्रिकइन्फो अवॉर्ड्समध्ये बोलताना सचिन म्हणाला, “माझं वैयक्तिक मत आहे की ‘इम्पॅक्ट प्लेयर’चा नियम रद्द केला पाहिजे. टी-२० फॉरमॅटमध्ये तुम्हाला फक्त २० षटकं खेळावी लागतात. जे गोलंदाजांसाठी मोठं आव्हान असतं. त्यात फलंदाजी करणाऱ्या संघात आणखी एका फलंदाजाचा समावेश केल्यास खेळात असंतुलन निर्माण होतं.”

सचिन तेंडुलकरने आयपीएलमध्ये गोलंदाजांसाठी पॉवरप्ले लागू करण्याची शिफारस केली आहे. मास्टर ब्लास्टर म्हणाला, सध्या पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकांमध्ये वर्तुळाबाहेर केवळ दोन क्षेत्ररक्षक ठेवण्याची परवानगी असते. माझ्या मते, पहिली चार षटकं ही फलंदाजांची पॉवरप्ले असावीत आणि त्यात सध्याप्रमाणेच क्षेत्ररक्षणाचे नियम लागू राहावेत. त्यानंतर उर्वरित दोन पॉवरप्ले षटकं कधी घ्यायची, याचा निर्णय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधाराला घेता यावा. सामन्याच्या कोणत्याही टप्प्यावर सलग दोन षटकांसाठी तो हा पर्याय वापरू शकेल. त्या दोन षटकांमध्येही वर्तुळाबाहेर एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक ठेवण्याची मुभा असावी.”

सचिनच्या मते, “यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सामन्यावर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येईल.” याशिवाय, मास्टर ब्लास्टरने आणखी एक महत्त्वाची सूचना केली. प्रत्येक गोलंदाजाने आता चारऐवजी पाच षटकं टाकवी, असं त्याचं मत आहे. सचिन म्हणाला, “एका गोलंदाजाला पाच षटकं टाकण्याची मुभा असावी. कारण बहुतांश वेळा संघातील सर्वोत्तम गोलंदाजच ते पाचवं षटक टाकणार असतो. आपल्याला त्या सर्वोत्तम गोलंदाजाला अधिक गोलंदाजी करताना पाहायला आवडणार नाही का? सर्वोत्तम फलंदाज कधीकधी संपूर्ण २० षटकं फलंदाजी करतात. मग सर्वोत्तम गोलंदाजाला पाच षटकं टाकण्याची संधी का मिळू नये?” असा सवाल सचिनने उपस्थित केला.