सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही भारतीय संघाची आतापर्यंतची वन-डे क्रिकेटमदली सर्वोत्तम सलामीची जोडी होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भारतीय क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं नाव मोठं करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. ९० च्या दशकात हे सर्व क्रिकेटपटू भारतीयांच्या गळ्यातले ताईत होते. सचिन, सौरव, द्रविड, लक्ष्मण यांची फलंदाजी पाहण्यासाठी लोकं टिव्हीसमोर ठाण मांडून बसायचे. सचिन आणि सौरव गांगुली यांच्यातला याराना सर्वांना माहिती आहे. अनेकदा सोशल मीडियावर आपण याची प्रतिचीही घेतली आहे.

परंतु कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात १९९७ साली विंडीज दौऱ्यात सचिन आणि सौरव यांच्यात एक वाद झाला होता. ज्यात भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या सचिन तेंडुलकरने ‘दादा’ला तुझं करिअर संपवेन अशी धमकी दिली होती. बार्बाडोस कसोटीत भारताला वेस्ट इंडिजकडून मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. विजयासाठी १२० धावसंख्येचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकरची टीम इंडिया ८१ धावांत गारद झाली होती. ३८ धावांनी भारताने हा सामना गमावला. या पराभवामुळे सचिनला चांगलाच धक्का बसला होता. हातात आलेला सामना, भारताने गमावला होता. यावेळी सौरव गांगुली आपल्या कर्णधाराला धीर देण्यासाठी गेला असता त्याला सचिनच्या रागाचा सामना करावा लागला.

“सचिनने त्यावेळी सर्व खेळाडूंना ड्रेसिंग रुममध्ये उपदेशाचे धडे दिले. यावेळी त्याला स्वतःच्या क्षमतेवरही शंका येत होती. यावेळी सौरव सचिनला धीर द्यायला गेला असतान सचिनने त्याला उद्यापासून सकाळी माझ्यासोबत धावायला यावं लागेल, तयार रहा असं सांगितलं. मात्र गांगुली सचिनसोबत धावायला गेलाच नाही. त्यामुळे संतापलेल्या सचिनने गांगुलीला, असा हलगर्जीपणा चालणार नाही. तुझी बॅग घेऊन घरी पाठवेन आणि कारकिर्द संपवेन अशी धमकी दिली होती.” Sports Tak या यू-ट्युब व्हिडीओमध्ये क्रीडा पत्रकार विक्रांत गुप्ता यांनी हा किस्सा सांगितला आहे.

सचिनच्या या रागवण्याचं गांगुलीने कधीही वाईट वाटून घेतलं नाही हे देखील तितकचं खरं. यानंतरही सचिन आणि गांगुली या जोडीने भारताला अनेक सामने जिंकवून दिले. या जोडीच्या नावावर अनेक विक्रम जमा आहेत. २००८ साली गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तर सचिनने २०१३ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. सौरव गांगुली सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून काम पाहतो आहे.