वरकरणी बघितले तर क्रिकेट आणि दुचाकी चालवण्यात काहीही साम्य दिसत नाही. मात्र, दोन्ही ठिकाणी वापरली जाणारी एक गोष्ट सारखी आहे ती म्हणजे हेल्मेट. क्रिकेटच्या मैदानावर उसळत्या चेंडूंपासून फलंदाजाच्या डोक्याचे आणि चेहऱ्याचे संरक्षण करण्याचे महत्त्वाचे काम हेल्मेट करते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) फलंदाजांसाठी हेल्मेटचा वापर सक्तीचा केलेला आहे. क्रिकेटच्या मैदानाप्रमाणेच रस्त्यांवरदेखील हेल्मेट अतिशय उपयुक्त आहे. दुचाकीस्वाराने हेल्मेट घातलेले असेल तर अपघाताच्या प्रसंगी त्याचा जीवही वाचू शकतो. म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी आता मुंबईमध्ये दुचाकीवर बसलेल्या दोन्ही व्यक्तींसाठी हेल्मेट सक्तीचे केले आहे. वाहतूक पोलिसांचा या निर्णयाची दखल भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही घेतली आहे. सचिनने याबाबत एक ट्विट केले असून ते सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

वाहतूकीच्या नियमांनुसार दुचाकी चालकाने हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. मात्र, बहुतेक दुचाकीस्वार या नियमाला केराची टोपली दाखवताना दिसतात. मुंबई शहरामध्ये अनेक दुचाकीस्वार विनाहेल्मेट गाड्या चालवितात. चालकाच्या मागे बसलेली व्यक्ती सुद्धा हेल्मेटचा वापर करत नाहीत. अशा लोकांना वठणीवर आणण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी आता हेल्मेट घालणे बंधनकारक केले आहे. मुंबईच्या वाहतूक पोलीस मुख्यालयाकडून याबाबत एक माहितीपत्रक जाहीर करण्यात आले आहे. हे बघून क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने काहीशा मिश्किल अंदाजात पण एक मार्मिक ट्विट केले आहे. त्याने आयसीसी आणि मुंबई वाहतूक पोलीस विभागाला टॅग करून हे ट्विट केले आहे. ‘मैदानावर आणि मैदानाबाहेर अशा दोन्ही ठिकाणी हेल्मेट जीव वाचवते. त्यामुळे दुचाकीवर बसलेल्या स्ट्रायकर (चालक) आणि नॉन स्ट्रायकरने (चालकाच्या मागे बसलेली व्यक्ती) हेल्मेट वापरले पाहिजे’, असा संदेश त्याने या ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.

वाहन कायदा १९८८ कलम १२९ सह १९४ (ड) अन्वये, मोटारसायकलस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणं बंधनकारक आहे. मुंबई वाहतूक पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकाव्दारे नागरिकांना दुचाकीवर प्रवास करताना हेल्मेट घालण्यास सांगण्यात आले आहे.

या नियमाचे पालन न केल्यास येत्या १५ दिवसानंतर धडक कारवाई सुरू केली जाणार आहे. विना हेल्मेट दुचाकी चालविल्यास ५०० रुपये दंड तसेच तीन महिन्यांसाठी वाहन परवाना रद्द केला जाईल.