भारतीय संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर २४ एप्रिलला वयाच्या ४७ व्या वर्षात पदार्पण करतो आहे. परंतू यंदा देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि खडतर काळात करोनाशी लढणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सचिन यंदाचा वाढदिवस साजरा करणार नाहीये. सचिनच्या जवळच्या मित्राने पीटीआय वृत्तसंस्थेला याविषयी माहिती दिली.

“ही वेळ कोणतंही सेलिब्रेशन करण्याची नाही. सध्याच्या काळात डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, पोलिस कर्मचारी करोनाचा सामना करण्यासाठी घराबाहेर आहेत, अशा लोकांचा सन्मान करण्यासाठी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचं सचिनने ठरवलं आहे.” सचिनच्या मित्राने माहिती दिली. करोनाविरुद्ध लढ्यात सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्री सहायता निधीला ५० लाखांची मदत केली आहे. क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली असली तरीही आजही जगभरात सचिनला फॉलो करणारे अनेक चाहते आहेत, अशा परिस्थितीत चाहत्यांनी आपल्या लाडक्या क्रिकेटपटूचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काही नवीन युक्ती शोधून काढल्या आहेत.