Vinesh Phogat Disqualified Olympics 2024 : विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून अपात्र ठरवण्यात आल्याने संपूर्ण देश संतप्त झाला आहे. आज सूर्य उगवला तेव्हा देशाला विनेश फोगटकडून किमान रौप्य पदकाची अपेक्षा होती, पण भारतीय महिला कुस्तीपटू अंतिम सामना खेळू शकणार नसल्याचे वृत्त येताच सर्व देशवासियांची निराशा झाली. या बातमीने सर्वसामान्य भारतीयच नाही तर क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही निराश झाला आहे. सचिनने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहून विनेश फोगट आणि निशा दहियाचे कौतुक केले आहे. सचिन तेंडुलकर काय म्हणाला? सचिन तेंडुलकरने एक्सवर लिहिले की, "निशा दहिया आणि विनेश फोगट, तुमच्या दोघींच्या धैर्य आणि दृढनिश्चयाने संपूर्ण देशाला एक नवी प्रेरणा दिली आहे. कारण निशाचे दुखापत होऊनही इतक्या उत्कटतेने देशासाठी लढणे खरोखरच आश्चर्यकारक होते. विनेश, अपात्र ठरवूनही, तुझा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास आणि युई सुसाकीविरुद्धचा विजय विलक्षण होता. जरी आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल आले नसले, तरीही तुमची मान उंच ठेवा कारण संपूर्ण देश तुमच्या मागे उभा आहे. आम्हाला तुम्हा दोघींचा खूप अभिमान आहे." विनेश फोगटने कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचून ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यामुळे संपूर्ण देशाला तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती, मात्र महिलांच्या ५० किलो कुस्तीच्या अंतिम फेरीपूर्वी केवळ १०० ग्रॅम वजन जास्त आढळल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. या बातमीने विनेश फोगट धक्काच बसला आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. विनेशने रात्रभर वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न केला पण यश मिळू शकले नाही. वजन कमी करण्यासाठी तिने रात्रभर जोमाने व्यायाम केला. तिने तिचे केसही कापले पण तिचे वजन ५० किलोपर्यंत खाली आणता आले नाही. हेही वाचा - IND vs SL 3rd ODI : श्रीलंकेसमोर भारताचे सपशेल लोटांगण; २७ वर्षांनी टीम इंडियाने गमावली वनडे मालिका तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जर एखाद्या कुस्तीपटूचे वजन त्याच्या वजन श्रेणीपेक्षा जास्त असेल तर त्याला त्या पातळीवर आणण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. विनेशच्या शरीराचे वजन जास्त होते आणि तिला ५० किलोपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. यूडब्ल्यूडब्ल्यू निमंत्रण टूर्नामेंटमध्ये दोन किलोची सूट देते परंतु ऑलिंपिक, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये हा नियम लागू होत नाही. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी खेळाडूंना एक-दोन दिवस अन्न-पाण्याशिवाय राहावे लागते.