पाकिस्तानचा अव्वल फिरकीपटू सईद अजमलची चाचणी २४ जानेवारीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) चेन्नईतील केंद्रामध्ये होणार आहे. अवैध गोलंदाजी शैलीमुळे अजमलवर सप्टेंबर महिन्यामध्ये बंदी घालण्यात आली होती.
या चाचणीमध्ये अजमल उत्तीर्ण झाला तर त्याला त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळता येऊ शकेल, पण या चाचणीत तो नापास झाल्यास त्याला काही दिवसांचा अवधी दिला जाईल आणि या अवधीमध्ये त्याला पुन्हा एकदा चाचणीला सामोरे जावे लागेल. विश्वचषक स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली असून या स्पर्धेसाठी अजमल पाकिस्तानचा हुकमी एक्का असेल. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) माजी फिरकीपटूंच्या सहाय्याने अजमलच्या गोलंदाजी शैलीमध्ये काही बदल केले आहेत. जर अजमल या चाचणीत नापास ठरला, तर त्याला विश्वचषकापूर्वीच दुसऱ्या चाचणीला सामोर जावे लागेल.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख मोहम्मद अक्रम म्हणाले की, ‘‘ अजमल हा चाचणीसाठी पूर्णपणे तयार आहे. शैलीमध्ये बदल करण्यासाठी अजमलने पुरेसा वेळ घेतला आहे, गोलंदाजी शैलीवर मेहनतही घेतली आहे.
आयसीसीच्या गोलंदाजी नियमांचा चौकटीमध्ये राहून अजमलने सराव केला आहे. त्यामुळे या चाचणीमध्ये तो उत्तीर्ण होईल, असा आम्हाला विश्वास आहे.’’