माले : कर्णधार सुनील छेत्रीच्या दुहेरी गोल धडाक्यामुळे भारताने यजमान मालदीववर ३-१ असा विजय मिळवत ‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यातील दोन गोलसह छेत्रीने (७९ गोल) आंतरराष्ट्रीय फुटबॉल सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतील ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले (७७) यांना मागे टाकले. भारताला या स्पर्धेत आगेकूच करण्यासाठी मालदीवविरुद्ध विजय मिळवणे अनिवार्य होते. भारताने सुरुवातीपासून मालदीवच्या बचावफळीवर दडपण टाकले. त्यांनी चेंडूवर ताबा मिळवला. ३३व्या मिनिटाला मनवीर सिंगने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु ही आघाडी काही मिनिटेच टिकली. मध्यंतरापूर्वी अली अश्फाकने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केल्यामुळे मालदीवने सामन्यात बरोबरी साधली. मात्र प्रेरणादायी छेत्रीने पुन्हा एकदा विजयवीरची भूमिका बजावताना नऊ मिनिटांत (६२ आणि ७१वे मिनिट) दोन गोल करत भारताला आघाडी मिळवून दिला. यानंतर बचावफळीने उत्कृष्ट खेळ केल्याने भारताने हा सामना जिंकला. आता शनिवारी (१६ ऑक्टोबर) होणाऱ्या ‘सॅफ’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतापुढे नेपाळचे आव्हान असेल.