नेपाळविरुद्ध आज अंतिम सामना

माले : अडखळत्या सुरुवातीनंतर दमदार पुनरागमन करत लय प्राप्त केलेल्या भारतापुढे ‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या शनिवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात नेपाळचे आव्हान असेल. नेपाळला पहिल्यांदाच अंतिम फेरीचा पल्ला गाठता आल्याने या सामन्यात विक्रमी सात वेळच्या विजेत्या भारताचे पारडे जड मानले जात आहे.

‘सॅफ’ स्पर्धेच्या १३ पैकी १२ हंगामांत भारताला अंतिम फेरी गाठण्यात यश आले आहे. या आशियाई खंडातील स्पर्धेत भारताने वर्चस्व गाजवले असून केवळ २००३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. नेपाळविरुद्ध विजय मिळवल्यास मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे हे पहिलेच जेतेपद ठरेल. मात्र, मालदीवविरुद्ध लाल कार्ड दाखवण्यात आल्याने त्यांना सामन्यादरम्यान खेळाडूंसोबत ‘डगआऊट’मध्ये बसता येणार नाही. त्यांच्या अनुपस्थितीत सहाय्यक प्रशिक्षक षण्मुगम वेंकटेश भारतीय संघाला मार्गदर्शन करतील.

भारताला यंदा पहिल्या दोन लढतींमध्ये बांगलादेश आणि श्रीलंका या संघांनी बरोबरीत रोखले. त्यामुळे त्यांचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळण्याची भीती निर्माण झाली होती. परंतु त्यांनी पुढील लढतीत नेपाळचा १-० असा पराभव केला आणि यजमान मालदीववर ३-१ अशी मात करत अंतिम फेरीतील स्थान पक्के केले.

जागतिक क्रमवारीत नेपाळचा संघ (१६८वे स्थान) भारतापेक्षा ६१ स्थानांनी खाली आहे. मात्र, त्यांनी या स्पर्धेत उत्तम कामगिरी करताना चारपैकी दोन सामने जिंकले. परंतु त्यांना मागील काही काळात भारताला पराभूत करता आलेले नाही. या दोन संघांमध्ये झालेल्या मागील तीन सामन्यांत दोनदा भारताने बाजी मारली असून एक सामना बरोबरीत राहिला होता. त्यामुळे भारत वर्चस्व कायम राखताना आठवे जेतेपद पटकावणारी की नेपाळ त्यांना पराभवाचा धक्का देणार याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.

सुनील छेत्रीवर भिस्त

भारताने यंदाच्या ‘सॅफ’ फुटबॉल स्पर्धेत पाच गोल केले असून यापैकी चार गोल कर्णधार सुनील छेत्रीने केले आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यातही ३७ वर्षीय छेत्रीवर भारताची भिस्त आहे. या सामन्यात गोल करण्यात यश आल्यास तो लिओनेल मेसीच्या (८०) आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील गोलसंख्येची बरोबरी करेल.

’ सामन्याची वेळ : रात्री ८.३० वा.पासून   ’ थेट प्रक्षेपण : युरोस्पोर्ट