सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा : भारतीय फुटबॉल संघाला आठव्यांदा विजेतेपद!

नेपाळविरुद्धचे मागील तीनपैकी दोन सामने जिंकण्यात भारताला यश आले होते

नेपाळवर ३-० अशी मात; अंतिम सामन्यातही छेत्रीचा गोल

माले : भारतीय संघाने दबदबा कायम राखताना तब्बल आठव्यांदा ‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या चषकावर आपली मोहोर उमटवली. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळवर ३-० अशी मात करत मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांच्या मार्गदर्शनात पहिलेच जेतेपद पटकावले.

नेपाळविरुद्धचे मागील तीनपैकी दोन सामने जिंकण्यात भारताला यश आले होते. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात होते आणि या संघाने सुरुवातीपासूनच वर्चस्व प्रस्थापित केले. चौथ्या मिनिटाला मोहम्मद यासिर व अनिरुद्ध थापा यांनी मारलेले सलग दोन फटके नेपाळचा गोलरक्षक किरण कुमार लिंबूने अडवले. यानंतर २७व्या मिनिटाला कर्णधार सुनील छेत्रीचा गोल मारण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. तसेच नेपाळचा गोलरक्षक किरणनेही आणखी काही फटके अडवल्याने मध्यंतराला गोलशून्य बरोबरी होती.

उत्तरार्धात मात्र भारताच्या आक्रमणाला अधिक धार आली. ४९व्या मिनिटाला छेत्रीने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली, तर पुढच्याच मिनिटाला सुरेश सिंहच्या गोलमुळे भारताची आघाडी दुप्पट झाली.

यानंतर पिछाडीवर पडलेल्या नेपाळने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने प्रतिहल्ला सुरु ठेवत नेपाळच्या बचावफळीवर दडपण टाकले. अखेर ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेत सहाल अब्दुल समदने गोल करत भारताला हा सामना ३-० असा जिंकवून दिला आणि सर्व खेळाडूंनी एकच जल्लोष केला. गटसाखळीत भारताने दोन बरोबरीनंतर पुढील दोन लढती जिंकून अंतिम फेरी गाठली होती.

भारताचे वर्चस्व अबाधित

भारताने ‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील वर्चस्व अबाधित राखताना यंदा तब्बल आठव्यांदा जेतेपद पटकावले. आशिया खंडातील ही स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणाऱ्या संघांच्या यादीत मालदीवचा दुसरा क्रमांक असून त्यांनी दोनदा विजेतेपद मिळवले. भारताने १९९३, १९९७, १९९९, २००५, २००९, २०११, २०१५ आणि २०२१ मध्ये ही स्पर्धा जिंकली. तसेच भारतीय संघ चार वेळा या स्पर्धेचा उपविजेता होता.

छेत्रीची मेसीशी बरोबरी

कर्णधार छेत्रीने नेपाळविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताचे गोलचे खाते उघडले. हा त्याचा यंदाच्या स्पर्धेतील पाचवा गोल ठरला. त्यामुळे त्याने अर्जेटिनाचा आघाडीचा खेळाडू लिओनेल मेसीच्या (८०) आंतरराष्ट्रीय गोलसंख्येशी बरोबरी केली. ३७ वर्षीय छेत्रीने भारताकडून १२५ सामन्यांत ८० गोल केले आहेत. तसेच या वर्षांत त्याने उत्कृष्ट कामगिरी करताना १० सामन्यांत ८ गोल झळकावले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Saff championship india beat nepal 3 0 to clinch title zws