Sahibzada Farhan Century: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील ३५ वा सामना पाकिस्तान आणि नामिबिया या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हा दोन्ही संघांचा साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. पण हा सामना पाकिस्तानसाठी अतिशय महत्वाचा आहे. पाकिस्तानकडे हा सामना जिंकून सुपर ८ मध्ये प्रवेश करण्याची सुवर्णसंधी आहे. पण जर हा सामना गमावला, तर घरी परतावं लागेल. दरम्यान या महत्वाच्या सामन्यात पाकिस्तानकडून सलामीला येणाऱ्या साहिबजादा फरहानने दमदार शतकी खेळी केली. या शतकी खेळीच्या बळावर त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. सईम अयुब अवघ्या १४ धावांवर माघारी परतला. तर सलमान अली आघाने २३ चेंडूत ३८ धावांचे योगदान दिले. अवघे ३ टी-२० आंततरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव असणाऱ्या ख्वाजा नफायला या सामन्यासाठी पाकिस्तानच्या संघात स्थान देण्यात आलं होतं. पण तो देखील अवघ्या ५ धावा करून माघारी परतला. शेवटी फलंदाजी करताना शादाब खानने नाबाद ३६ धावांची खेळी केली. तर सलामीला फलंदाजी आलेला साहिबजादा फरहान शेवटपर्यंत उभा राहिला. त्याने नाबाद १० ० धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने संघाची धावसंख्या २० षटकांअखेर ३ गडी बाद १९९ धावांपर्यंत पोहोचवली आणि नामिबियाला विजयासाठी २०० धावांचे आव्हान दिले.
या डावात फलंदाजी करताना साहिबजादा फरहानने सावध सुरूवात केली. कारण एका बाजूने विकेट्स जात होते. त्यामुळे धावा जमा करण्यासह विकेट्स टिकवून ठेवण्याची जबाबदारीही त्याच्यावर होती. साहिबजादा फरहानने सुरूवातीच्या ३७ चेंडूत आपं अर्शतक पूर्ण केलं. तर ५७ चेंडूत शतक पूर्ण केलं. हे टी-२० वर्ल्डकपमध्ये कुठल्याही पाकिस्तानी फलंदाजाने झळकावलेलं दुसरं शतक आहे. याआधी २०१४ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानच्या फलंदाजाने शतक झळकावलं होतं. मीरपूरमध्ये झालेल्या सामन्यात अहमद शहजादने बांगलादेशचा सामना करताना नाबाद १११ धावांची खेळी केली होती. हे टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत कुठल्याही पाकिस्तानी फलंदाजाने झळकावलेलं पहिलं शतक होतं. आता साहिबजादा फरहान हा अशी कामगिरी करणारा पाकिस्तानचा दुसराच फलंदाज ठरला आहे.
पाकिस्तानसाठी अतिशय सामना
हा सामना पाकिस्तानसाठी अतिशय महत्वाचा आहे. पाकिस्तानला जर टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ मध्ये प्रवेश करायचा असेल, तर कुठल्याही परिस्थितीत नामिबियाला पराभूत करावं लागणार आहे. जर पाकिस्तानने हा सामना गमावला, तर अमेरिकेचा संघ टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ फेरीत प्रवेश करेल.

