Sahibzada Farhan Record: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील महत्वाचा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. श्रीलंकेचा संघ आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी हा सामना ६५ धावांच्या फरकाने जिंकणं गरजेचं आहे. त्यामुळे पाकिस्तानला चांगल्या सुरूवातीची गरज होती. पाकिस्तानकडून फलंदाजी करताना फखर जमानने दमदार अर्धशतकी खेळी केली. तर साहिबजादा फरहानने शतक पूर्ण केलं. हे त्याचं या स्पर्धेतील दुसरं शतक ठरलं आहे. या शतकी खेळीसह त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
टी-२० वर्ल्डकपमध्ये शतक झळकावणं ही कुठल्याही फलंदाजासाठी मोठी गोष्ट असते. पण साहिबजादा फरहानने एकदा नव्हे, तर दोनवेळा हा कारनामा करून दिला आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत पाकिस्तानचे इतर फलंदाज फ्लॉप ठरले. पण सलामीला येणाऱ्या साहिबजादा फरहानने पूर्ण जोर लावला. त्याने या स्पर्धेत २ शतकं झळकावली आहेत. याआधी नामिबियाविरूद्ध झालेल्या सामन्यात फलंदाजी करताना त्याने ५८ चेंडूत नाबाद १०० धावांची खेळी केली होती. आता श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात त्याने ५९ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं आहे. यासह एकाच टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत २ शतक झळकावणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. याआधी कुठल्याही फलंदाजाला एकाच वर्ल्डकपमध्ये २ शतकं झळकावता आलेले नाहीत. टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत २ शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड हा वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ख्रिस गेलच्या नावावर आहे. ख्रिस गेलने या स्पर्धेत २ शतकं झळकावली आहेत.
स्पर्धत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
या संपूर्ण स्पर्धेत साहिबजादा फरहानच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. २ शतकांच्या बळावर तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. यासह त्याने भारताचा माजी फलंदाज विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. आता टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील एकाच हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा साहिबजादा फरहानच्या नावे नोंदवला गेला आहे. साहिबजादा फरहानने टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत फलंदाजी करताना ३८३ धावा केल्या आहेत. यासह त्याने विराट कोहलीचा एकाच टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. विराट कोहलीने २०१४ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत ३१९ धावा केल्या होत्या.
एकाच टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
साहिबजादा फरहान- ३८३* धावा (२०२६)
विराट कोहली- ३१९ धावा (२०१४)
तिलकरत्ने दिलशान- ३१७ धावा (२००९)
बाबर आझम – ३०३ धावा (२०२१)
महेला जयवर्धने- ३०२ धावा ( २०१०)
