Asian Games 2026 Archery Compound Mixed Team Gold: आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये भारताने दुसरं सुवर्णपदक पटकावलं आहे. ‘कम्पाऊंड मिश्र सांघिक’ प्रकाराच्या अंतिम सामन्यात साहिल जाधव आणि चिकिता तनिपार्थी या जोडीने दक्षिण कोरियाच्या जोडीचा ‘शूट-ऑफ’मध्ये पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. या विजयामुळे चिकिता आणि साहिल या जोडीने २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठीचा ‘कोटा’ (स्थान) देखील निश्चित केला आहे.
२०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीतील भारताचे हे दुसरं सुवर्णपदक आहे; याआधी आजच महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात चिकिता, पृथिका आणि ज्योती यांच्या त्रिकूटाने सुवर्णपदक जिंकलं होतं. यासह भारताची एकूण पदकांची संख्या ५४ वर पोहोचली असून, त्यात ८ सुवर्णपदकांचा समावेश आहे.
तिरंदाजीच्या मिश्र सांघिक प्रकाराच्या अंतिम फेरीत चिकिथा आणि साहिल या जोडीने शानदार सुरुवात केली आणि पहिल्या फेरीनंतर ४०-३९ अशी आघाडी घेतली. त्यांनी दुसऱ्या फेरीत आपली आघाडी अधिक वाढवत ८०-७८ अशा गुणांसह सामना पूर्ण केला. भारताच्या दोन्ही तिरंदाजांनी तिसऱ्या गेममध्येही आपली आघाडी कायम राखत तो गेम ११८-११७ अशा फरकाने आपल्या नावे केला. मात्र, चौथी फेरी भारतीय जोडीच्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही; दक्षिण कोरियाच्या जोडीने ४० गुण मिळवले, तर भारतीय जोडीला केवळ ३९ गुणच मिळवता आले. यामुळे गुणसंख्या १५७-१५७ अशी बरोबरीत सुटली आणि सामना ‘शूट-ऑफ’मध्ये गेला.
शूटऑफमध्ये भारताचा एका गुणाने शानदार विजय
गुणसंख्या बरोबरीत राहिल्यानंतर सुवर्णपदक निश्चित करण्यासाठी गेम ‘शूट-ऑफ’मध्ये गेला, तेव्हा चिकिथाने १० गुण मिळवून सुरुवात केली आणि दक्षिण कोरियाच्या पार्कनेही १० गुण मिळवले; मात्र, चिकिथाच्या बाणापेक्षा पार्कचा बाण केंद्राच्या अधिक जवळ होता. त्यानंतर साहिलनेही १० गुण मिळवले, पण पार्कच्या तुलनेत त्याचा बाणही केंद्रापासून थोडा अधिक दूर असल्याचं दिसून आलं.
भारताला दक्षिण कोरियाचा तिरंदाज चोई याच्याकडून ९ गुणांची आवश्यकता होती आणि त्याने नेमके तेवढेच गुण मिळवून दिले, ज्यामुळे भारताला सुवर्णपदक जिंकता आलं. या विजयामुळे चिकिथा आणि साहिल यांनी लॉस एंजिलिस (LA28) ऑलिम्पिक स्पर्धेतील कंपाऊंड मिश्र सांघिक तिरंदाजी प्रकारासाठीचा कोटाही निश्चित केला.
