बुधवारी सकाळी आशियाई क्रीडा स्पर्धेत साहिल जाधव आणि तानिपारथी चिखिता या जोडीने मिक्स्ड कंपाऊड तिरंदाजीत सुवर्णपदकावर नाव कोरलं. सुवर्णपदकासाठी झालेल्या शूटऑफमध्ये भारतीयांनी दडपणाच्या परिस्थितीत अव्वल खेळ करत बाजी मारली. तासाभराआधी भारतीय महिला त्रिकुटाने सुवर्णपदकावर कब्जा केला होता. त्या यशावर या दोघांनी कळस चढवला. या सुवर्णपदकासह साहिल-तानिपारथी जोडीने २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला. साहिलसाठी इथवरचा प्रवास खाचखळग्यांनी भरलेला होता. मूलभूत गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत असतानाही साहिलने तिरंदाजीची आवड जोपासली. मिनी ऑलिम्पिक असं वर्णन होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक पदकाला गवसणी घातली.
साहिल सातारचा. कोरोना काळात त्याच्या वडिलांची नोकरी गेली. अशा परिस्थितीत तिरंदाजीसारख्या खेळाची आवड जोपासणं कठीण झालं. पण साहिलच्या आईने हार मानली नाही. साहिलच्या धनुष्यबाणासाठी त्यांनी स्वत:चे दागिने विकले. जाधव कुटुंबीयांनी घरातलं सोनं गमावण्याचं दु:ख अनुभवलं. त्याच कुटुंबीयांसाठी साहिलने आशियाई क्रीडा स्पर्धेसारख्या मोठ्या स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरत सोनं कमावलं.
‘कोरोना काळात वडिलांची नोकरी गेली. त्यावेळी माझं खेळणं कठीण होतं. पण आईने दागिने विकण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच धनुष्यबाण आणि अन्य साहित्य विकत घेऊ शकलो. त्यांनी सदैव साथ दिली. त्यामुळेच कोलकाता इथल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दररोज सराव करू शकलो’, असं साहिलने सांगितलं.
साताऱ्यातील प्रवीण सावंत यांच्या दृष्टी तिरंदाजी अकादमीत अनेक प्रतिभाशाली तिरंदाज घडत आहेत. आशियाई स्पर्धेत पदकप्राप्त अदिती स्वामी आणि ओजस देवतळे हे दोघेही प्रवीण यांच्या अकादमीचे विद्यार्थी. साहिल यानेही तिरंदाचीची धुळाक्षरं प्रवीण यांच्याकडेच गिरवली. त्यानंतर तो प्रगत प्रशिक्षणासाठी कोलकात्याला रवाना झाला. २०१६ मध्ये साहिल तिरंदाजीकडे वळला. शाळेत तो विविध खेळांच्या स्पर्धेत सहभागी होत असे. घरच्यांचा पाठिंबा, प्रशिक्षकांचं मार्गदर्शन, तिरंदाजी संघटना- भारतीय क्रीडा प्राधिकरण, क्रीडा मंत्रालय या सगळ्यांचा साहिलच्या वाटचालीत मोलाचा वाटा आहे.
गेल्या वर्षी झालेल्या आशियाई आऊटडोअर चॅम्पियनशिप स्पर्धेत साहिलचा समावेश असलेल्या त्रिकुटाने रौप्यपदकाची कमाई केली होती. यावर्षी झालेल्या वर्ल्डकप स्टेज १ मध्ये साहिलने कांस्यपदक मिळवलं होतं.
असं मिळवलं सुवर्णपदक?
तिरंदाजीच्या मिश्र सांघिक प्रकाराच्या अंतिम फेरीत चिकिथा आणि साहिल या जोडीने शानदार सुरुवात केली आणि पहिल्या फेरीनंतर ४०-३९ अशी आघाडी घेतली. त्यांनी दुसऱ्या फेरीत आपली आघाडी अधिक वाढवत ८०-७८ अशा गुणांसह सामना पूर्ण केला. भारताच्या दोन्ही तिरंदाजांनी तिसऱ्या गेममध्येही आपली आघाडी कायम राखत तो गेम ११८-११७ अशा फरकाने आपल्या नावे केला. मात्र, चौथी फेरी भारतीय जोडीच्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही; दक्षिण कोरियाच्या जोडीने ४० गुण मिळवले, तर भारतीय जोडीला केवळ ३९ गुणच मिळवता आले. यामुळे गुणसंख्या १५७-१५७ अशी बरोबरीत सुटली आणि सामना ‘शूट-ऑफ’मध्ये गेला.
गुणसंख्या बरोबरीत राहिल्यानंतर सुवर्णपदक निश्चित करण्यासाठी गेम ‘शूट-ऑफ’मध्ये गेला, तेव्हा चिकिथाने १० गुण मिळवून सुरुवात केली आणि दक्षिण कोरियाच्या पार्कनेही १० गुण मिळवले; मात्र, चिकिथाच्या बाणापेक्षा पार्कचा बाण केंद्राच्या अधिक जवळ होता. त्यानंतर साहिलनेही १० गुण मिळवले, पण पार्कच्या तुलनेत त्याचा बाणही केंद्रापासून थोडा अधिक दूर असल्याचं दिसून आलं.
भारताला दक्षिण कोरियाचा तिरंदाज चोई याच्याकडून ९ गुणांची आवश्यकता होती आणि त्याने नेमके तेवढेच गुण मिळवून दिले, ज्यामुळे भारताला सुवर्णपदक जिंकता आलं. या विजयामुळे चिकिथा आणि साहिल यांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कंपाऊंड मिश्र सांघिक तिरंदाजी प्रकारासाठीचा कोटाही निश्चित केला.
