महिला जिम्नॅस्टिकपटूच्या अपमान प्रकरणी सुरुवातीला दडपण्यासाठी प्रयत्नशील असलेला भारतीय जिम्नॅस्टिक महासंघ अखेर पोलीस तक्रारीनंतर जागा झाला असून अंतर्गत चौकशी समितीच्या अहवालानंतर आरोपी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
२ सप्टेंबरला इंदिरा गांधी क्रीडा संकुलामध्ये २० वर्षीय महिला जिम्नॅस्ट सराव करत असताना आंतरराष्ट्रीय खेळाडू चंदन पाठक आणि त्याचे प्रशिक्षक  मनोज राणा यांनी या महिलेवर अश्लील टिप्पणी केली होती.  या घटनेनंतर महिलेने महासंघाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण तो अपयशी ठरला. त्यानंतर या महिलेने संघटनेकडे याबाबत लेखी तक्रार केली; पण महासंघातील पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता.