दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडिअममध्ये मंगळवारी सायंकाळी एका १८ वर्षीय धावपटूने आत्महत्या केली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार परविंदर चौधरी असे या धावपटूचे नाव असून मंगळवारी ६.३०च्या सुमारास त्याने आत्महत्या केली. ‘एएनआय’ने या संबधीचे वृत्त दिले होते. या संदर्भात भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) चौकशीचे आदेश दिले आहेत.

आत्महत्येची घटना ही जवाहरलाल नेहरू स्टेडिअमधील अकादमीच्या परिसरात घडली आहे. त्यामुळे या प्रकरणी आम्ही विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. SAIचे सचिव स्वर्ण सिंग छाबरा यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी होणार आहे. आठवडाभरात ही चौकशी पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती SAIचे महासंचालक नीलम कपूर यांनी पीटीआयला सांगितले.

जवाहरलाल नेहरू स्टेडिअम परिसरातील अकादमीत असलेल्या वसतीगृहात तो राहात होता. परविंदर सराव संपवून सायंकाळी साडेपाच वाजता आपल्या खोलीत परतला होता. त्यानंतर साडेसहाच्या आसपास त्याने खोलीत गळफास घेतला, असे सांगितले जात आहे. परविंदरने आत्महत्या का केली, याचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, परविंदर आणि त्याच्या वडिलामध्ये एक दिवस आधी एका कारणावरुन वाद झाला होता. त्याने (परविंदर) सकाळी वडिलांबरोबर झालेल्या वादाबाबत मला सांगितले होते. त्यानंतर त्याची बहीण त्याला भेटायला आली होती. पण दुर्दैवाने सायंकाळी त्याने आत्महत्या केली. आम्ही सर्व प्रयत्न करुनही त्याला वाचवू शकलो नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.