‘साई’च्या तामिळनाडू केंद्रात १५ प्रशिक्षणार्थी खेळाडूंचा लैंगिक छळ, आरोपी प्रशिक्षक निलंबीत

महासंचालक निलम कपूर यांची पीटीआयला माहिती

भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी साई कठोर पावलं उचलणार

Sports Authority of India अर्थातच ‘साई’ने आपल्या तामिळनाडू येथील प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षकावर निलंबनाची कारवाई केली आहे. आपल्या हाताखाली प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंचा लैंगिक छळ केल्याची तक्रार ‘साई’कडे दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ‘साई’ने केलेल्या अंतर्गत चौकशीमध्ये ‘तो’ प्रशिक्षक दोषी आढळल्याने त्याचं तात्काळ निलंबन करण्यात आलेलं आहे. या प्रशिक्षकाचं नाव ‘साई’ने अद्याप जाहीर केलेलं नाहीये.

तामिळनाडू केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या सुमारे १५ खेळाडूंनी ‘साई’कडे प्रशिक्षकांविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. “होय, आम्ही त्या प्रशिक्षकाला निलंबीत केलं आहे. साईच्या केंद्रांमध्ये महिला व अन्य खेळाडूंना सरावासाठी भयमुक्त वातावरण तयार करणं ही आमची जबाबदारी आहे. त्यानुसार आम्ही प्रशिक्षकांवर योग्य ती कारवाई केली आहे.” ‘साई’च्या महासंचालक निलम कपूर यांनी पीटीआयला माहिती दिली.

तामिळनाडूत घडलेला प्रकार भविष्यात कोणत्याही केंद्रात होऊ नये याकरता आपण उपाययोजना आखत असल्याचं कपूर यांनी स्पष्ट केलं. यापुढे ‘साई’च्या सरावकेंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडूंसाठी हेल्पलाईन तयार करण्यात येणार असल्याचंही कपूर म्हणाल्या. तसेच खेळाडूंचा कोणत्याही प्रकारे छळ केल्याचं समजताच प्रशिक्षकांवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही कपूर यांनी दिला आहे. देशभरात ‘साई’ची १० हजार प्रशिक्षण केंद्र आहेत. यातील अनेक केंद्रावर खेळाडूंचा लैंगिक छळ झाल्याच्या तक्रारी समोर येत असतात. त्यामुळे या घटनेनंतर ‘साई’ आणि क्रीडा मंत्रालय नेमकं काय पावलं उचलतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sai sacks coach on sexual harassment charge vows strict measures