आयपीएल २०२६ स्पर्धेतील ६६ वा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात गुजरातच्या फलंदाजांकडून दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. सलामीला आलेल्या शुबमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीने तुफान फटकेबाजी केली आणि पहिल्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली. या दमदार सुरुवातीच्या बळावर आणि शतकी भागीदारीच्या बळावर या जोडीने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

आयपीएल २०२६ स्पर्धेत गिल आणि साई सुदर्शनचा दमदार फॉर्म पाहायला मिळाला आहे. हाच फॉर्म चेन्नई सुपर किंग्स संघाविरुदच्या सामन्यातही पाहायला मिळाला. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातला चांगल्या सुरुवातीची गरज होती. ही सुरुवात गिल आणि सुदर्शनने करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १२५ धावा जोडल्या. दोघांनी मिळून आयपीएल स्पर्धेत ७ व्यांदा शतकी भागीदारी केली आहे. यासह आयपीएल स्पर्धेत सलामीवीर फलंदाज म्हणून सर्वाधिक वेळेस शतकी भागीदारी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ही जोडी अव्वल स्थानी पोहोचली आहे.

याआधी शुबमन गिल आणि साई सुदर्शनची जोडी अभिषेक शर्मा- ट्रॅव्हिस हेड आणि शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नरच्या जोडी सह संयुक्तरित्या अव्वल स्थानी होती. या जोडीच्या नावे ६- ६ वेळेस शतकी भागीदारी करण्याची नोंद होती. आता शुबमन गिल आणि साई सुदर्शनच्या जोडीने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे. शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर या जोडीने देखील ६ वेळा शतकी भागीदारी केली आहे.

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळेस शतकी भागीदारी करणाऱ्या सलामी जोड्या

शुबमन गिल – साई सुदर्शन = ७ वेळेस

अभिषेक शर्मा – ट्रॅव्हिस हेड= ६ वेळेस

शिखर धवन – डेव्हिड वॉर्नर= ६ वेळा

जॉनी बेअरस्टो – डेव्हिड वॉर्नर= ५ वेळा

विराट कोहली – फाफ डू प्लेसिस = ५ वेळेस

गुजरातचा दमदार विजय

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. गुजरातकडून शुबमन गिल, जोस बटलर आणि साई सुदर्शन या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली. यादरम्यान गुजरातने २० षटकांअखेर ४ गडी बाद २२९ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा डाव अवघ्या १४० धावांवर आटोपला. यासह चेन्नईने हा सामना ८९ धावांनी गमावला.