Sai Sudarshan Record: आयपीएल २०२६ स्पर्धेतील क्वालिफायर २ चा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सने एकतर्फी विजयाची नोंद केली. यासह आयपीएल २०२६ स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात कर्णधार शुबमन गिलने दमदार शतकी खेळी केली. त्याला चांगली साथ देत साई सुदर्शनने अर्धशतकी खेळी केली. या अर्धशतकासह साई सुदर्शनने आयपीएल स्पर्धेत विराट कोहलीच्या मोठ्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
न्यू चंदिगडमध्ये पार पडलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सचा संघ २१५ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यामुळे गुजरात टायटन्सला चांगल्या सुरुवातीची गरज होती. साई सुदर्शनने गिलसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. यादरम्यान त्याने ३२ चेंडूत ५८ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने ८ चौकार आणि १ षटकार खेचला. या खेळीच्या बळावर गुजरातला जशी सुरुवात हवी होती, तशी सुरुवात मिळाली.
विराट कोहलीच्या मोठ्या रेकॉर्डची केली बरोबरी
साई सुदर्शनचं हे या हंगामातील ८ वे अर्धशतक ठरले आहे. यासह त्याने आयपीएल स्पर्धेतील एकाच हंगामात सर्वाधिक अर्धशतकं झळकावण्याच्या रेकॉर्डमध्ये विराट कोहलीच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. याआधी विराटने आयपीएल २०२५ स्पर्धेत फलंदाजी कराताना त्याने ८ अर्धशतकं झळकावले होते. या हंगामात साई सुदर्शनने दमदार कामगिरी केली असून १६ सामन्यांमध्ये ८ अर्धशतकं आणि १ शतक झळकावलं आहे. विराट आणि साई सुदर्शनला वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला एकाच हंगामात ८ अर्धशतकं झळकावता आलेले नाही. गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. त्यामुळे या सामन्यात साई सुदर्शन या रेकॉर्डमध्ये आणखी पुढे जाऊ शकतो.
आयपीएल स्पर्धेतील एकाच हंगामात सर्वाधिक अर्धशतकं झळकावण्याचा रेकॉर्ड हा सनरायझर्स हैदराबादचा माजी फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. वॉर्नरने २०१६ मध्ये झालेल्या हंगामात ९ अर्धशतकं झळकावले होते. पुढील सामन्यात अर्धशतक झळकावताच साई सुदर्शन हा रेकॉर्ड मोडून काढू शकतो. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या हंगामातही त्याने ८ अर्धशतकं आणि १ शतक झळकावलं होतं. यासह केन विलियम्सनने २०१८ मध्ये आणि फाफ डू प्लेसिसने २०२३ मध्ये झालेल्या हंगामात एकाच हंगामात ८ अर्धशतकं झळकावले होते.
