भारताचा मधल्या फळीतील फलंदाज साई सुदर्शन रणजी करंडक स्पर्धेत राजस्थानविरुद्धच्या लढतीत दुखापतग्रस्त झाला. जयपूर इथे हा सामना होत आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाला तेव्हा सुदर्शन कव्हर भागात क्षेत्ररक्षण करत होता. करन लांबाने लगावलेला ड्राईव्हचा फटका अडवताना त्याला दुखापत झाली. त्याला उठून उभं राहताना त्रास जाणवू लागला. फिजिओंनी मैदानात धाव घेत सुदर्शनवर उपचार केले. फटका अडवताना सुदर्शनच्या गुडघ्याला दुखापत झाली. मात्र ही दुखापत गंभीर नसल्याचं संघव्यवस्थापनाने स्पष्ट केलं. गुडघ्याला आईस पॅक लावण्यात आला. दुखापत बळावली नाही तर सुदर्शन क्षेत्ररक्षणाला येऊ शकतो असंही सांगण्यात आलं.
सुदर्शन फलंदाजी करू शकतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. साई सुदर्शन या सामन्यासाठी येणं अपेक्षित नव्हतं. तो ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या भारतीय अ संघाचा भाग होता. तो पुदुच्चेरी इथे होता. रविवारी झालेल्या वनडेत साई सुदर्शनऐवजी प्रियांश आर्यला संधी देण्यात आली. त्यामुळे सुदर्शनने रणजी करंडक स्पर्धेसाठी रवाना होण्याचा निर्णय घेतला. रात्री उशिरा जयपूरला पोहोचला. तो निवडीसाठी उपलब्ध आहे हे तामिळनाडू निवडसमितीलाही ठाऊक नव्हतं.
ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेत सुदर्शनला चार डावात मिळून एकच अर्धशतकी खेळी करता आली. कसोटी मालिकेनंतर झालेल्या वनडेत १ आणि १३ एवढ्याच धावा करता आल्या. पायाला झालेल्या दुखापतीतून सुदर्शन सावरत होता. सुदर्शनऐवजी देवदत्त पड्डीकलला भारतीय संघात स्थान मिळालं. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत देवदत्तने दमदार कामगिरी करत संघाच्या व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारत अ संघाविरुद्ध कसोटी मालिका होणार आहे. त्यासाठी सुदर्शनाची निवड झाली आहे. सोमवारी झालेली दुखापत गंभीर नसल्याने सुदर्शन न्यूझीलंडला रवाना होईल अशी चिन्हं आहेत.
